पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सोडून एक तप पूर्ण होत आलं. गेल्या तपात ही संस्थाबाह्य किती प्रश्न आहेत, हे लक्षात आल्यावर मी तप करत राहिलो. कुणाला धीर दे, कुणाचे समुपदेशन कर, कुणाचं संयमानं ऐकत राहा, कुणाला पैसे दे, कुणाला पुस्तक... अडेल त्या गाडीला हात द्यायचा. चाक आवाज करू लागलं की वंगण घाल, पलीकडच्याला जाणीव असो नसो... करत राहा, हे करणं केवळ समाजाचीच गरज नसते. ती माझीही असते. कारण आज माझं आयुष्य निष्प्रश्न होऊन सुखाच्या अवकाशानं मोकळं आहे. ते भरणं माझी गरज असते. पूर्वी माझं प्रश्नांनी भरलेलं आकाश कुणीतरी असंच हात देऊन निरभ्र केलं होतं. आज मी तेच करतो आहे. असं प्रत्येक पिढीत घडत असावं. झीज नि भर हाच तर सामाजिक अविनाशत्वाचा सिद्धांत... मला गवसलेला... बिंदू-बिंदूतून सिंधु उदयला!

दुःखहरण/४२