पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुसरं तिचंही ऑपरेशन करायला तो तयार नव्हता... मनात कुठं तरी संशय होता असं लक्षात आलं. इकडे आड, तिकडे विहीर अशी स्थिती होती. थोडा विचार करा असे सांगून वेळ घ्यायला हवी, असं मला वाटलं. बाईंना तुम्ही पण विचार करा असं सुचवलं.
 काही दिवस गेले नि अरविंद सरूला घेऊन संस्थेत दत्त. काय विचारताना म्हणाला, “बिंदूचे दोनदा पाय घसरले... तुम्ही तिला सावरले... हिला पण एकदा सावरा. बिंदूला कळू देऊ नका. मी हिला वचन दिलं होतं. बिंदूप्रमाणे तुला पण तुझा हक्क देईन... बाळ देईन." त्याच्या ठिकाणी तो बरोबर होता. सरूला सावरायला पाहिजे होतं, हेही खरं. बिंदू ऑपरेशन करून मोकळी करणं पूर्वानुभवामुळे धोक्याचं... अशा विचित्र कात्रीत संस्था... मी... बाई होतो.
 मी विचार करू लागलो... आपण, संस्था जे कार्य करतो ते आपत्ती व्यवस्थापन आहे, की आपत्ती निमंत्रण... हे आपत्ती नियंत्रण कसं होईल? पण हा अत्यंत दूरचा प्रवास आहे. समाजमन घडवणं ही दीर्घकालीन कामगिरी मात्रा सर्वांना सारखी कधीच लागू पडत नाही. कारण व्यक्ती हे। विचित्र रसायन आहे. वैचित्र्य हे त्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. व्यक्ती, व्यक्तीमधील भावनिक गुंतवणूक व गुंता त्याचे अनेक पदर असतात. हा गुंता सोडवणं अवघड काम असतं. गुंता सुटून धागा सरळ तर व्हायलाच हवा; पण मध्ये गाठ राहता नये हे पाहावं लागतं. त्याचसाठी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक यांची अनिवार्य गरज असते.
 आम्ही सरूला प्रवेश देऊन दुस-या संस्थेत परगावी ठेवायचा निर्णय घेतला. तिला मोकळी करून लग्न करायचं ठरवलं. दरम्यान अरविंद आणि बिंदूला दर महिन्याला संस्थेत बाईंना भेटायची सक्ती केली. हा क्रम तीन वर्षे संयमाने व व्रतासारखा करत राहिलो. एक दिवस बिंदू, रवींद्र, त्यांचा रमेश, सरू, तिचा नवरा, तिची मुलगी हेमा सर्व जण मिळून पाया पडायला आले. म्हणाले, “आम्ही दोघांनी एका ठिकाणी रो हाऊसिंगमध्ये जुळे घर घेतलंय. वास्तु प्रवेश दादा तुमच्या हस्ते करायचा आहे. वास्तुशांतीनिमित्त संस्थेतल्या सगळ्यांना आम्ही जेवण ठेवलं आहे. या बरं का?"

 जग बदलतं... घसरलेले पाय सावरतात... माणसं बदलतात... तुमचा चांगुलपणावर अटळ विश्वास हवा. आज माझ्या लक्षात येतं... निराळं जग, निराळी माणसं आहे म्हणून समाजाचा समतोल आहे... समाज कृपण आहे नि कृतज्ञही! तुम्हाला सांगड घालता आली पाहिजे. संस्थात्मक काम

दुःखहरण/४१