पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फाटलेल्या आकाशाला टाका घालताना...


 नेहमीप्रमाणे एका संध्याकाळी मी बालकल्याण संस्थेत काम करत बसलो होतो. तेवढ्यात एक महिला पोलीस एका लहान मुलीस संस्थेत दाखल करण्याचा कोर्टाचा आदेश घेऊन आल्या. झालं असं होतं, त्या मुलीच्या वडिलांनी तिच्या आईचा म्हणजेच आपल्या पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून केला होता. पोलिसांनी त्याला जेरबंद केलं होतं. मुलीला आई-वडिलांच्या जवळच्या नातेवाइकांनी सांभाळण्यास नकार दिल्यानं मुलगी पोलिसांनी निराधार घोषित करून आमच्या स्वाधीन केली होती.

 तिचं नाव संध्या. ती संस्थेत आली तेव्हा पाच वर्षांची चिमुरडी होती. आली तेव्हा भेदरलेली होती. तिनं आपल्या आईचा खून प्रत्यक्ष पाहिला होता; पण वडिलांनी गुन्हा कबूल केल्यामुळे तिला साक्ष देण्याचा काही प्रसंग आला नाही. संध्याचा सांभाळ आमचे सगळे काळजीवाहक मनापासून करायचे. बघता बघता संध्या मुलींत रमली. संस्थेत रुळली. शाळेतही। जाऊ लागली. अनाथाश्रम, रिमांड होम, कारागृहासारख्या संस्थांत एक असतं, तिथं वेगळ्या कारणांनी आलेली मुलं, मुली, स्त्री-पुरुष कोणीच कोणाची नसतात; पण परिस्थितीनं ती समाज संपर्कापासून, घरादारापासून दूर लोटली गेल्यानं प्रारंभी एकलकोंडी, अंतर्मुख, आत्ममग्न, मौन, उदास असतात; पण हळूहळू वातावरण त्यांना सांगत राहतं. किती दिवस एकटा, उपाशी, असा जागा राहणार! हे काही दिवस, तासाचं जग नाही... इथं तुला अर्धे आयुष्य काढायचं आहे. अनेक वर्षं राहायचं आहे. मग तो अथवा ती व्यक्ती हळूहळू स्वतःला बदलते नि मग तिथलं जग त्याचं/ तिचं होतं.

दुःखहरण/१९