पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 संध्या शाळेत जाऊ लागली नि एक दिवस टपालात तिच्या वडिलांचा एक विनंती अर्ज व ते ज्या जेलमध्ये शिक्षा भोगत होते, त्या कारागृह अधीक्षकाचं पत्र होतं... बंदी विश्वनाथ पांढरे यांची मुलगी आपल्या संस्थेत आहे. त्याला तिला भेटायची इच्छा आहे... तो सारखा आठवण काढून रडत असतो... कधी-कधी दोन दोन दिवस जेवतही नाही. अमुक... तमुक... या दिवशी त्या भेटीची वेळ निश्चित केली आहे. तरी तिला भेटीस घेऊन यावे... जेलर चांगले असल्याने त्यांनी फोन करूनही आमच्या अधीक्षिकेस सर्व समजावलं होतं.
 संस्थात्मक चौकटीत भावना व व्यवहारात जमीन अस्मानाचं अंतर असतं. जेलरचं पत्र आलं तरी संध्या आमच्याकडे बालन्यायालयाच्या निरीक्षणात होती. त्यांची परवानगी आवश्यक होती. ती मिळाली नि संध्या बाबांना भेटून आली. ती जशी भेटून आली तशी परत घुमी, एकटी राहू लागली. तिच्या चेह-यावरचं हास्य, तेज काळवंडल्याचं माझ्या लक्षात आलं. तिचा पालक म्हणून माझी स्थिती मोठी विचित्र झाली होती. इकडे आड तिकडे विहीर! मी त्या काळात अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे रिपोर्ट वाचायचो. मानव अधिकारांबद्दल जागृत होत होतो. संध्याच्या अशा दोन-चार भेटींतून तिची बदलणारी स्थिती मला अस्वस्थ करत होती. तिला भेटू द्यावं तर पंचाईत, न द्यावं तर अडचण शिवाय संस्थेतून प्रत्येक वेळी कोर्ट, ऑर्डर, वॉरंट, काळजीवाहक पुरवणं त्रासाचं व्हायचं.
 मग काही वर्षांनी संध्याच्या वडिलांच्या वकिलांनी कोर्ट निकालानंतर मुलीला भेटता यावं म्हणून जेल बदलून मागितलं नि तो आमच्या शहरातल्या जेलमध्ये आला. आता संध्या दर पंधरा दिवसांनी त्यांना भेटत होती. भेटीत वडील जेलमधल्या भत्त्यातून तिला खाऊ द्यायचे. जेलमध्ये कैदी कामं करतात. त्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना भत्त्याच्या रूपात पैसे मिळतात. जेलमध्ये छोटं कॅन्टिन, बेकरी असते. तिथून ते गरजेच्या मान्य वस्तू विकत घेऊ शकतात. बाप, मुलगी दोघं खूश बघून आम्ही निवांत झालो.

 संध्या पाहता पाहता मोठी झाली. हायस्कूलमध्ये शिकू लागली. वडिलांच्या केसचा निकाल लागल्यानंतर तिला आम्ही कोर्टातून सोडवून घेऊन सर्टिफाय करून बालगृहात ठेवलं होतं. त्यामुळे संध्या आता वयाच्या अठरा वर्षांपर्यंत संस्थेत राहू शकत होती. तिची शाळेतली प्रगतीही चांगली होती. नाकीडोळी नीटस असल्यानं ती संस्थेतल्या प्रत्येक नाचगाण्यात असायची. स्वभाव लाघवी असल्यानं सगळ्यात मिळून मिसळून राहायची. आता संध्याचं जीवन हा काही आमच्या चिंतेचा विषय राहिला नव्हता,

दुःखहरण/२०