पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/129

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


अशा फकिरी उदारतेनं त्या सेवा करत राहिल्या. त्यांचं रक्ताचं कोणी नसलं, तरी गरजेच्या वेळी आख्खी गावं त्यांच्या पाठीशी उभी असायची. त्या वेळी त्यांना पंचायतीच्या निवडणुकीसाठीही आग्रह व्हायचा. कारण सगळ्या पक्षाचे लोक त्यांना मानत; पण सेवाधर्म त्यांनी सोडला नाही. राजकारणापेक्षा समाजसेवेचीच कास धरत त्या चालत राहिल्या.
 याचं फळ म्हणा, त्यांचं उत्तरायुष्य सुखात गेलं. शैलाचं लग्न झालं. मग मंगल आश्रमातून आली. तिचेही हात पिवळे केले. दरम्यान, प्रकाश मोठा झाला. त्याला आजरा बँकेत गारगोटीतच नोकरी मिळाली. पाहतापाहता नातवंडांमुळे घराचं गोकूळ झालं. जागा घेतली. घर बांधलं. आज त्यांचे जीवन स्वर्गाहूनही सुखी आहे!
 आज त्या वयाची ८० वर्षे पूर्ण करत आहेत. सहस्त्रचंद्रदर्शनयोग जीवनात येईल, असं त्यांना कधी वाटलं नव्हतं. लहानपणी गरिबीमुळे, तारुण्यात वैधव्यामुळे, प्रौढपणी मुलांच्या काळजीने, नंतर जीवन संघर्षामुळे... कारणं बदलत गेली पण दिवस काही बदलत नव्हते. त्यांच्या जीवनातले एकेक प्रसंग मी वेळोवेळी ऐकले आहेत. कुणालाच असे दिवस येऊ नयेत, असं त्यांचं सारं ऐकताना वाटत राहतं. नवरा वारला तेव्हा त्यापूर्ण अनाथ, निराधार झाल्या होत्या. त्यात नवग्याच्या विम्याचे पैसे आले. दोन हजार रुपये. त्या वेळी ती रक्कम मोठी होती. कनवटीला राहील, अशी ती एकमेव पुंजी; पण ते आमचे पैसे आहेत म्हणून दीर हटून बसले. त्यांनी फार त्रास दिला; पण चार आजूबाजूचे खंबीर पाठीराखे निघाले, नि त्यातूनही त्या तावूनसुलाखून बाहेर पडल्या.

 असे एक ना दोन अनेक प्रसंग आले. त्या खंबीरपणे तोंड देत राहिल्या, माता धीराई म्हणून. बाई असूनही कत्र्या पुरुषासारख्या स्वतःच्या हिमतीवर व स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. या कष्टांना मरण नाही, येणाच्या संकटांना अंत नाही' असं गुणगुणत त्यांनी आयुष्य मागं टाकलं. आज समोर आहे आनंदाचा मळा... ‘आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे. कधी काळी कुणी आपल्यावर लिहील असं त्यांच्या स्वप्नातही आलं नसेल; पण जग दुर्लक्ष करत असलं तरी आंधळं नसतं. त्याला चांगल्या-वाईटाची पारख असते. सोन्याला आपली झळाळी सिद्ध करायला तेजाबातून वर यावं लागतं. बापटबाईंच्या जीवनातील आजचे दिवस म्हणजे तिमिरातून तेजाकडे जाणारा एक प्रेरक प्रवास... एक प्रेरक जीवन!

दुःखहरण/१२८