पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/128

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


सुरू होणार होतं. त्यासाठी खेडोपाडी जाऊन आरोग्यसेवा देणारी सेविका हवी होती. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव नोंदवल्याचा फायदा झाला आणि कॉल आला. नोकरीही मिळाली. कारण कोणीच यायला तयार नव्हतं. काम फिरतीचं होतं. पंढरपूर सोडून बापटबाई गारगोटीला आल्या. डॉ. चित्रा नाईक तेव्हा हे काम पाहायच्या. रोज एक गाव याप्रमाणे आठवड्याला सात गावं करावी लागायची. सुट्टी नसायची. प्रवास पायी असायचा. कारण त्या वेळी गावांना एस.टी. जात नव्हती. रस्ते नव्हते. नद्यांवर पूल नव्हते. होड्या होत्या. बैलगाडी हेच प्रवासाचं साधन होतं. ते पण हमरस्त्यापुरतं. वाडी, वस्ती, डोंगरकपारीत पायीच जावं लागे. बाळंतीण अडली वा आडवेळेला कळा येऊ लागल्या तर डोली, कावड करून बाळंतिणीला आणावं लागायचं. म्हसवे, खानापूर, कलनाकवाडी, आकुर्डे, सालपेवाडी, पुष्पनगर, सोनारवाडी ही अधिकृत गावं असली, तरी पंचक्रोशीत फिरावं लागायचं. कष्ट होते तरीपण सेवेचं समाधान होतं.
 हे काम करत असताना डॉ. पंडित यांनी स्वतःचं प्रसूतिगृह काढायचं ठरवलं. आणि बापटबाईंना नोकरी देऊ केली. फिरती कमी व एका जागी काम. तशात शैलाचा बाँड संपल्यानं ती घरी येणार होती. सर्वांचा विचार करून मौनी विद्यापीठाची नोकरी त्यांनी सोडली. डॉ. पंडित तेव्हा त्यांना २00 रुपये पगार देत; पण सर्व पाहायला लागायचं. त्यांनी समाजसेवा केंद्र सोडलं; पण त्यांचे जुने सर्व पेशंट डॉ. पंडितांकडे येऊ लागले. त्या वेळी भुदरगड तालुका सहकारी संघ होता. कॉ. मोरे, कॉ. भांगिदरे, कॉ. देसाई इ. मंडळी तो पाहात. त्यांच्या घरची, संघाची, पक्षाची अशी सर्व कार्यकर्ती मंडळी कामामुळे त्यांच्या परिचित झाली होती. त्यांचे कष्ट पाहता मिळणारा तुटपुंजा पगार पाहून सर्वांनी “तुम्ही समाजसेवा केंद्रासारखं घरोघरी काम सुरू करा. आम्ही मदत करू." म्हणून त्यांना उभारी दिली. त्यांनी परत पहिल्यासारखं घरोघरी जाऊन औषधोपचार, सलाइन, बाळंतपण सुरू केलं. अगदी अडलं तर कोल्हापूरला पेशंट नेणं सुरू झालं. यातून एक झालं, आजवरच्या अनुभवामुळे अडायचं नाही. निदान अचूक असायचं. माणसं भोळी, प्रेमळ होती. बाईंचा हातगुण म्हणून आवर्जून डॉक्टरांपेक्षा त्यांनाच बोलवायची. आया-बाया डॉक्टरपेक्षा बाई बरी म्हणून बापटबाईंनाच सांगावा धाडायच्या.

 कष्ट पडले तरी पैसे मिळू लागले; पण त्यामुळे त्यांनी कधी लोभीपणा दाखवला नाही. बापटबाई म्हणजे गावोगावच्या आया-बायांची ताई, आई, माई, आक्का झाली. ‘जो देगा उसका भला, न देगा उसका भी भला'

दुःखहरण/१२७