पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/118

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


समांतर कार्यक्रम सुरू व्हायचा. तिकडं साडीतल्या मुलींना पदराचं भान राहायचं नाही. असा बिनपैशाचा बिपिनचा तमाशा म्हणजे फूल टू धमाल!
 बिपिन बालवाडीपासूनच माझ्याबरोबर होता; पण माझी एकेक इयत्ता वाढत जायची. उलटपक्षी त्याची मात्र एक इयत्ता हमखास मागं राहायची. आयुष्यभर बिपिनने मार्कलिस्टवर 'पास' हा शेरा लिहून घेतला नाही. एक तर ‘नापास' नाहीतर ‘वर घातला' (ढकलला!) नववीपर्यंत बिपिन वर ढकलत, चढत राहिला. कधी कधी मनात विचार येतो, उदार मायबाप शिक्षक नसते, तर वयाच्या अठराव्या वर्षीही बिपिन बालमंदिरातून फार फार तर पहिलीत गेला असता. ऐन परीक्षेच्या दिवशीही बिपिन हातात पुस्तक धरेल तर शपथ! हायस्कूलला जाता जाता आम्ही पंढरपूरहून कोल्हापूरला आलो रिमांड होममध्ये. रिमांड होममध्ये मुलं सुधारतात म्हणे! बिपिन आणखीनच बिघडला. त्याचं सदैव लक्ष खेळ, स्वयंपाक, गंमतजंमत यातच. इथं येऊन तो स्वयंपाकघरात अधिक रमू लागला. संस्थेत स्वयंपाकघरास भिशी म्हणायचे. हा कायम भिशीत पडून असायचा. संस्थेने नेमलेले आचारी नावाला असायचा. तो नुसतं फोडणी द्यायचं काम करायचा. बाकी रेशन काढणं, धान्य निवडणं, दळणं, पीठ मळणं, भाजी चिरणं, पोळ्या लाटणं-भाजणं; सर्वांना बिपिन पुरून उरायचा. सकाळ, संध्याकाळ शंभर मुलांचं जेवण तो एकटा करायचा. त्याचा फायदा आम्हाला भरपूर व्हायचा. चांगलं-चुंगलं बिपिनमुळे आम्हाला खायला मिळायचं. त्याच्याच भाषेत सांगायचं झालं तर ‘असली माल!'
 आम्ही शिकत असायचो तेव्हा बिपिन आपल्या वारंगे, लाल्या, देसाई इ. गैंगबरोबर मार्केट यार्डला जा, गूळ शेंगा खा, गोळा कर. शेतात जा, ऊस खा, टॉकीजमध्ये जा, पोस्टर्स, फोटो बघ, मॅच बघत बस. शाळेच्या शेजारी जयप्रभा स्टुडिओ होता. तिथं शूटिंग चालायचं, ते बघत बस. ग्राऊंडवर विहीर होती, शेतात पण एक होती. तिथं जा, पोहत राहा. असे एक से एक उद्योग बिपिनला कसे सुचायचे कोण जाणे! एकदा आमच्या रिमांड होमच्या साहेबांनी बिपिनला शाळा चुकवून फिरताना पकडलं व प्रार्थनेच्या वेळी सर्वांपुढे त्याची चंपी केली. एवढ्यानं बिपिन बधेल तर तो कसला. जेवण झाल्यावर साहेबांची नक्कल करत त्यानं आमची वळवलेली मुरकुंडी आजही आठवली की हसता भुई थोडी होते.

 पुढे त्याची नि माझी रिमांड होमची मुदत संपली. तो स्टेट होमला गेला नि मी गारगोटीच्या मौनी विद्यापीठात कॉलेजसाठी म्हणून गेलो. मग

दुःखहरण/११७