पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एका शून्याचं शतक होणं


 बिपिनला मी त्यांच्या नि माझ्या बालपणापासून पाहत आलो आहे. खरं तर आम्ही दोघं एकमेकांच्या सान्निध्यात लहानाचे मोठे झालो. आम्ही दोघं पंढरपूर बालकाश्रमात जन्मलो, वाढलो. त्याला त्याची जन्मदाती आई सत्यवती जन्म देऊन सोडून गेली. सत्यवतीच्या खोलीत राहणा-या। लक्ष्मीबाईंनी लळा लागलेल्या बिपिनला नंतर सांभाळलं. लक्ष्मीबाई म्हणजे मायेचा अखंड झरा! त्यांनी विठ्ठल, सुमंत, बेबी, श्रीमती, मीरा, सुमन अशा कितीतरी मुला-मुलींचा सांभाळ केला. लक्ष्मीबाईंची खोली आमच्या खोलीशेजारीच होती. त्यांच्या खोलीसारखी आमची खोली; पण नेहमी मुला-मुलींनी भरलेली असायची. बिपिन लहानपणापासून खोडकर. उपजत हजरजबाबीपण त्याच्यात होता. एक नंबरचा खट्याळ. मुलगा असून फ्रॉक घालून आश्रमभर फिरायचा. त्याच्या मागे ‘बुटकाऽऽ, बुटका, भुंडीऽऽ मुंडी म्हणत मुलींची झुंड चिडवत, डिवचत फिरत राहायची. तो लहानपणापासून नकला करण्यात पटाईत. उंदी, लोल्या, पी, अव्वा अशा आश्रमातील विसंगत, अपंग विक्षिप्तांची टिंगल, टवाळी, नकलांचा बिपिनचा कार्यक्रम एकदा का सुरू झाला की अख्खा आश्रम जागा व्हायचा... गारुड्याचा खेळ जमतो तसा. “बच्चे लोग ताली बजाव' न म्हणता टाळ्यांचा पाऊस पडत राहायचा. त्याच्या नकलेत श्रेष्ठ, कनिष्ठ भेद नसायचा. आश्रमाचे साहेब नि शिपाई त्याच्या लेखी सारखेच असायचे. हसून-हसून सा-यांची मुरकुंडी वळायची. लहान मुली हसून लोळा-गोळा व्हायच्या. गाठीनं बांधलेल्या त्यांच्या बिननाडीच्या चड्ड्या मोकळ्या होऊन एक नवीनच

दुःखहरण/११६