नेहमीच सापडत नाही. ज्याला स्वत:चे वेगळेपण सापडते तो कवी. हे निराळेपण जे शोधतात पण त्यांना सापडत नाही ते प्रयोगकर्ते. आणि ज्याचे दु:खच खरे नसून ती एक अभिनयाची बाब आहे ते कारागीर. जत्रेत, यात्रेत हवसे, गवसे, नवसे सगळेच एकत्र आहेत. याही दिंडीत कवी, प्रयोगकर्ते व कारागीर एक आहेत. असणारच. कारण ही दिंडी आहे. पैकी कोणाचा गट कोणता या पंचनाम्यात मला रस नाही. या वेदनेचे स्वरूप समजून घेण्यात मला जास्त रस आहे.
श्रद्धांचा अभाव, यंत्रयुग आणि माणसाचा एकटेपणा ही आजच्या युगातील दु:खाची कारणे होत, ते दु:खाचे स्वरूप नाही. आजच्या मानवाचे दु:ख हे शारीरिक दु:ख नाही. हातपाय मोडल्या, पिरगाळल्यामुळे, आजारामुळे होणारे दुःख जसे शारीरिक असते तसे हे नाही. हे दु:ख सांस्कृतिक आहे. माणूस जर यंत्र होऊ शकला, जर माणसाला पशू होणे जमले तर मग त्याला हे दु:ख जाणवणार नाही. आणि सांस्कृतिक दु:खाला उत्तर माणसाला नवी प्रतिष्ठा मिळवून देणे, त्याच्या मनाला नव्या श्रद्धा मिळवून देणे हे आहे.
युगायुगाच्या जाणिवा निराळ्या असतात. रिनायझान्स नंतर दोन महत्त्वाच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आपणाला दिसतात. आहे तो धर्मदास्यातील समाज, आहे तसा मान्य करणारे गुलाम. मन संपले, म्हणजे नवे बंडखोर मन नवा विचार घेऊन येते व समाज बदलू पाहते. आपल्या इच्छेनुसार समाज बदलण्याचा प्रयत्न करू पाहणारे हे मन दोन महायुद्धांच्या जखमांनी जखमी व हताश झाले आहे. त्याची नवी उमेद मावळलेली दिसते. याच शेजारी त्याच वेळी अजून एक प्रक्रिया सुरू झाली होती. विचाराचे नेतृत्व झुगारून देऊन भावना, प्रेरणा, प्रवृत्तींचे नेतृत्व स्वीकारणारी व स्वत:च्या इच्छांच्या खेरीज इतर कोणतेही नियंत्रण न-मानणारी अशी ही दुसरी प्रकिया होती. स्वत:च्या प्रेरणा व भावना अधिक निकोप सुखापर्यंत नेतील या जाणिवेने सुरू झालेला प्रवास मनाची गुंतागुंत दिसत गेली तसतसा निरनिराळे गंड आणि वासनांची विकृतरूपे या भोवऱ्यात भोवळ येईतो फिरून आता क्रमाने थकू लागला आहे. आजच्या युगाच्या दुःखाचे एक स्वरूप हे आहे की त्यात चिंतनाचा भाग सारखा वाढतो आहे. हे दु:ख भावगर्भ आहेच पण ते चिंतनशील आहे. या चिंतनाला पुन:पुन्हा जीवनातील अतार्किक व्यर्थता तेवढी दिसत आहे.
या वर्तुळाचा छेद घ्यायचा तर दुःखाच्या सांस्कृतिक रूपाचा शोध घेतला पाहिजे. सांस्कृतिक दु:ख म्हणजे काय? मूल्यांच्या जाणिवेखेरीज जे दु:ख विस्तारत असते ते सांस्कृतिक म्हणता येईल काय? आम्ही श्रद्धाहीन, मूल्यहीन