Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यंत्र करू लागते मग माणूस बाहेरच्या जगापासून तुटतो व एकटा होतो. शंभर घरांच्या खेड्यात तो कुणाचा सोयरा असतो, कुणाचा भावकी असतो, कुणाचा मित्र, कुणाचा शत्रू असतो. लक्ष घरांच्या शहरात सगळे फक्त एकटे व अनोळखी असतात. अपरिचित आणि संबंधहीन थव्याने घेरलेला असा तो गर्दीत गुदमरलेला एकटा असतो. येथून मन बाहेर ओढून काढायचे तर आत पाहण्यासाठीही काहीच नसते. कारण आत अंधार पसरलेला असतो. वासनांचे अजगर वळवळत असतात. आत पाहताना भ्यालेला आणि बाहेर आपला कुणीच नसल्यामुळे बावरलेला, जीवंतपणाचे ओझे पेलताना कमरेत वाकलेला पण जिवंत राहणे भाग असणारा आजचा माणूस ज्या अर्थाने एकटा आहे तसा जुना माणूस कधीच एकटा नव्हता. या एकटेपणातून जन्मलेला आक्रोश हेच या दिंडीचे समूहगान आहे.

 या एकटेपणात आपले स्वत:चे पशुत्व तेवढे आपले उरलेले आहे. गंभीरपणे आयुष्य चिवडताना माणूस वासना चिवडीत बसतो, अगर थकलेल्या मनाने विश्रांतीसाठी म्हणून तो वासनेच्या उबदार कुशीत शिरू इच्छितो. एक मार्ग वासनोत्तेजक औषध घेऊन हरवलेले तारुण्य शोधण्याइतका केविलवाणा असतो. दुसरा मार्ग विकृतीच्या वळवळीशी एकरूपता पावणारा आणि भकास असतो. नाही म्हणायला कधी आठवणी चाळवल्या गेल्या म्हणजे प्रीती-भावना यांसारखे काही अनोळखी शब्द दिसू लागतात व आपणच आपणाला विचारू लागतो. या शब्दांचे अर्थ काय असावेत बरे? ते शब्द ओळखीचे तर वाटतात पण त्यांचे अर्थ मात्र परदेशी व अनोळखी वाटू लागतात.

 हे दु:ख खोटे नाही. खरेच आहे. दु:ख कधी संपणार नाही. पण त्याचा हा प्रकार मात्र बदलू शकतो. मात्र त्यासाठी हे दुःखच एक सांस्कृतिक जाणीव आहे, असे पटले पाहिजे. कचकड्याच्या गोंडस, निर्जीव बाहुल्यांशी खेळण्यात जन्म गेलेल्या पिढीला हे सोलीव जिवंत दु:ख खोटे वाटते व स्वत:च्या हातात असणाऱ्या रंगीबेरंगी बाहुल्या खऱ्या वाटतात. ती पिढी सोडून द्या. बाकी इतरांना दुःखाचा खरेपणा मान्य आहे, दुःख खरे असले तरी तेच चोंभाळीत बसावे काय हा प्रश्न निराळा. तो दु:खाचा खरेपणा मान्य करून विचारलेला प्रश्न असतो. ज्या दु:खाने आपण दु:खी आहो ते आहे तरी कशाचे हाही प्रश्न निराळा. कारण तिथेही वेदनेचा खरेपणा मान्य असतो. तुमची वेदना खरी आहे पण ती युगधर्माची सामान्य जाणीव आहे. त्यात तुमचा स्वत:चा निराळेपणा आहे कुठे हा प्रश्न अजून निराळा. स्वत:चे वेगळेपण माणूस शोधीतच असतो. ते त्याला

दिंडी / ८५