पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३३

  १३१. सापें ज्यासी खावें । तेणें प्राणासी मुकावें ॥ १ ॥
काय लाधला दुर्जन । तोंडावरी थुके जन ॥ २ ॥ विंचु
हाणी नांगी । अग्न लावी आणिकां अंगीं ॥ ३ ॥ तुका
ह्मणे जाती । नरक पाउलीं चालती ॥ ४ ॥

  १३२. दुर्जनाचा मान । सुखें करावा खंडण ॥ १ ॥
लात हाणोनियां वरी । गुंडा वाट शुद्ध करी ॥ २ ॥
बहुतां पीडी खळ । त्याचा धरावा विटाळ ॥ ३ ॥ तुका
ह्मणे नखें । काढुन टाकिजेतीं सुखें ॥ ४ ॥

  १३३. सदा सर्वकाळ अंतरीं कुटिल । तेणें गळां
माळ घालू नये ॥ १ ॥ नाहीं धर्म दया क्षमा
शांति । तेणें अंगीं विभूती लावू नये ॥ २ ॥ जयासी न
कळे भक्तीचे महिमान । तेणे ब्रह्मज्ञान बोलों नये ॥ ३ ॥
ज्याचें मन नाहीं लागले हातासी । तेणें प्रपंचासी टाकू
नये ॥ ४ ॥ तुका ह्मणे ज्यासी नाहीं हरिभक्ति । तेणें
भगवे हातीं धरूं नये ॥ ५ ॥

  १३४. रोगिया मिष्टान्न मर्कटा चंदन । कागासी
लेपन कपुराचें ॥ १ ॥ निर्नासिका जैसा नावडे आरिसा ।
मूर्खालागीं तैसा शास्त्रबोध ॥ २ ॥ दास तुका ह्मणे
विठ्ठलउदारे । अज्ञानअंधेरे दूरी केलें ॥ ३ ॥

  १३५. दुधाचे घागरीं मद्याचा हा बुंद । पडिलिया
शुद्ध नव्हे मग ॥ १ ॥ तैसें खळां मुखें न करावें श्रवण ।
अहंकारें मन विटाळलें ॥ २ ॥ काय करावीं तीं बत्तीस
_______________________________________

१ गुंडा लात हाणोनिया वारी-दूर सारा. २ स्वाधीन झाले नाहीं.