पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रस्तावना.
______



तुकाराम महाराजांचे अभंग किती हृदयंगम व बोधपर आहेत,
सर्वांना माहीत आहेच. विविध कवींचे उतारे घेऊन त्यांत
तूकारामाच्या अभंगांचे थोडे उतारे घेतलेली अशीं मुलांकरिता
ही पुस्तके आहेत. गाथेतून बोधपर व उत्तम अभंग निवडून
काढून त्यांची विषयवार मांडणी ज्यांत केली आहे, असे हेच पुस्तक
आहे. आपण मुलांमुलींकरितां हे पुस्तक तयार करीत आहों, हीं
कल्पना पुढे ठेवून अभंग निवडण्याचे, ते प्रतवार लावण्याचे, टीपा,
स्पष्टीकरण व कोश देण्याचे काम केले आहे. सारांश, ही तुकाराम
गाथेची ‘बालगाथा'च होय. या दिशेने हा पहिलाच प्रयत्न आहे.
यात अश्लील शब्द होता होईल तों टाळले आहेत. दोन तीन
ठिकाणी अश्लील शब्द गाळून साधे शब्द घातले आहेत. ह्या
पुस्तकापासून काव्याचा अभ्यास होऊन शिवाय नैतिक व धार्मिक
रक्षणाचाही सहज लाभ होणार आहे. कुटुंबातील वडील
माणसांनी किंवा शिक्षकांनी मुलांमुलींना एक एक अभंगाचा अर्थ स्पष्ट
करून सांगावा आणि तो त्यांच्याकडून नेमाने पाठ करून घ्यावा.
याप्रमाणे हळू हळू अभ्यास होऊन दोन तीन वर्षांत जरी हे पुस्तक
वाचून झाले तरी बस्स आहे. अभंग जितके सावकाश व वारंवार वाचले
जातील, जितके ते मनांत खोल बिंबतील, तितका त्यांचा मनावर
एक सुपरिणाम होईल. एकदां अभंगांचे रहस्य मनांत बिंबलें कीं,
मग त्या भावी चरित्रास उत्तम वळण लागल्याखेरीज राहाणार नाहीं.
गृहशिक्षणांत या पुस्तकाचा अवश्य उपयोग व्हावा. त्याच प्रमाणे
खाजगी शाळांतून नीति शिक्षणाकरिता किंवा धर्म शिक्षणाकरितां हे
पुस्तक लावावे. सरकारी शाळांतून या पुस्तकाचा प्रवेश झाल्यास
ही गोष्ट सर्वांसच रुचणार आहे. कवि ह्या नात्याने तुकारामाची
योग्यता कमी कोण ह्मणेल ? त्याचे विचार सर्व धर्मांच्या लोकांना
पटतील असे उदात्त व व्यापक आहेत. मुलांमुलींना धर्म शिक्षण
मिळत नाही, ही ओरड फार जुनी आहे. बरे, कोणती पुस्तकें
शिक्षणाकरितां पसंत करावी, हाही वादग्रस्त प्रश्न आहे. परंतू
तुकारामाचे अभंग असे आहेत की, ते भिन्न मतांच्या लोकांना सुद्धा

मान्य होतील.