पान:तीन तत्वज्ञानी.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जॉर्ज बार्क्ले


चेंडूच्या डोळ्यांवर पडलेल्या आकृतीतील सूक्ष्म भेद ध्यानांत येईल. म्हणजे डोळ्यांवर पडलेल्या आकृतीच्या कमीअधिक स्पष्टपणावरून तो स्पर्शेद्रियाने होणाऱ्या वस्तूच्या खऱ्या आकाराचे व स्वरूपाचे बिनचूक अनुमान करूं लागेल. आपल्या डोळ्यांना प्रत्यक्ष अंतर दिसत नाही, तर संवयीने व अनुभवाने आपण अंतर अजमावतों, याचे अर्वाचीन काळचे उदाहरण म्हणजे एकामागे एक असलेले सिग्नलचे दिवे होत. रात्रीच्या वेळी हे दिवे एकाच अंतरावर असून समोरासमोर असलेल्या दोन दिव्यांप्रमाणे नवख्या माणसाला भासतात. पण रात्रीच्या प्रहरी काम करणाऱ्या स्टेशनवरच्या पोटरला दिव्यांच्या उजेडाच्या कमीअधिक प्रमाणावरून व लहानमोठ्या आकारावरून दूरच्या अंतराचा दिवा कोणता व जवळचा कोणता हे बिनचूक सांगतां येते.

 अशा व अशाच तऱ्हेच्या दुसऱ्या प्रमाणांवरून बार्क्लेने असे प्रतिपादन केले की, आपण जें वस्तूचे पाहणे म्हणतो ते खरोखरी पाहणे नसून अजमावणे असते. म्हणजे प्रत्येक अवलोकनक्रियेमध्ये मानवी मनाचा तर्कव्यापार न कळत चालू असतो. पदार्थापासून ज्या अवलोकन-संवेदना आपल्या मनावर उमटतात त्या एक प्रकारच्या खुणा असतात. त्यावरून त्याला दुसऱ्या इंद्रियांनी कोणत्या संवेदना अनुभवतां येतील हे समजते. आतां उघड उघड संवेदना या मानवी मनावर अवलंबून आहेत. मानवी मन नसेल तर संवेदना नाहीत व संवेदना नाहीत म्हणजे पदार्थ नाहीत. उदाहरणार्थ आंधळ्याला रंगाच्या संवेदना नाहीत. म्हणून त्याला डोळ्याने कोणत्याच गोष्टीचे आस्तित्व कळत नाही व त्या आंधळ्याला जर दुसरी स्पशेंद्रियांसारखी इंद्रिये नसली तर त्याला बाह्य वस्तूचे ज्ञान कांहीं होणार नाही, नव्हे बाह्य वस्तु ही कल्पनाच त्याला होणार नाही. त्याला भासणाऱ्या सर्व गोष्टी मानसिक आहेत असे त्याला वाटल. यावरून संवेदना या एक प्रकारची भाषा आहे असे म्हणणे प्राप्त आहे. ज्याप्रमाणे भाषेतील शब्दाचे द्वारे शब्दापेक्षां अगदी भिन्न अशा वस्तूचे आपल्याला

७३