पान:तीन तत्वज्ञानी.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिसून येते. लेखकामध्योहि जीवंत प्रतिभा दिसून येत नाही. वाचकांना करमणुकीपलीकडे काही चालत नाही व करमणूक करण्याचे साधन म्हणजे काल्पत गोष्टी, असाच अलीकडे सर्वसाधारण समज झाल्यासारखा दिसतो ! पण सत्यज्ञान देणारे कोणतेंहि वाङ्मय असो, ते तथ्य असून प्रेय असते, हे विसरता कामा नये, केव्हां केव्हां कल्पितापेक्षां सत्यच जास्त आश्चर्यकारक असते व या दृष्टीने इतिहास व चरित्रे ही कमी करमणुकीची साधने नाहीत. पण हल्लींच्या वाचकांची प्रवृत्ति अशी आहे की मथळ्यावरून एखादा लेख चरित्रात्मक किंवा इतिहासात्मक अथवा शास्त्रीय दिसला की, त्याकडे कानाडोळा करून एकदम कल्पिताकडे धांव घ्यावयाची ! पण चरित्रं सुद्धां कल्पितापेक्षाही जास्त मनोरंजक असतात हे दाखवण्याकरतां या लेखमालेचा उद्देश आहे."

 वरील उपोद्घात मी मासिक मनोरंजनांत कांहीं तत्त्वज्ञान्यांची चरित्र लिहितांना लिहिला होता. या चरित्रमालेत पांच सहा चरित्र लिहिण्याचा विचार होता. त्यांपैकी तीन चरित्र लिहून झाली होती. त्या चरित्रांपैकी दुसऱ्या दोन चरित्रांना त्या त्या तत्त्वज्ञान्यांच्या तत्त्वज्ञानाची थोडीशी माहिती जोडून ही चरित्रे ' तीन तत्त्वज्ञानी ' या नांवाने प्रसिद्ध करावी असें मनांत आल्यावरून ही आज पुस्तकरूपाने प्रसिद्ध करीत आहे. प्रथमतः ही चरित्र लिहिली तेव्हां ती यदृच्छया निवडली होती,पण आतां ती एकत्र छापतांना न कळत का होईना एक प्रकारची संगति यांत आली आहे असे वाचकांस दिसून येईल, या चरित्रांतील 'तीन तत्त्वज्ञानी' हे निरनिराळ्या देशांतील व निरनिराळ्या काळांतील आहेत हे खरें, तरी पण ते आपापल्या काळचे 'पर्व कर्ते तत्वज्ञानी' (Eyochmolsing philosophers ) आहेत. तसेच ते तिघेही 'चेतनवादी' आहेत. शेवटी त्यांची चरित्रेहि स्फूर्तिदायक आहेत, असें वाचकांस दिसून आल्याखेरीज राहणार नाही.

गोविंद चिमणाजी भाटे.