पान:तीन तत्वज्ञानी.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.

 अलीकडील मासिकांतील किंवा वर्तमानपत्रांतील औषधांच्या जाहिराती पहा, देशी परदेशी औषधांच्या दुकानदारांच्या विक्रीकडे नजर फेंका, वैद्य-डॉक्टरांच्या औषधांच्या पाठांचे निरीक्षण करा, किंवा सध्या आमच्या लोकांच्या खाण्यापिण्यांत येणाऱ्या पदार्थाकडे लक्ष द्या, या सर्वांवरुन आमच्यामध्ये अग्निमांद्याचा किती फैलाव झाल आहे, हे स्पष्ट दिसून आल्याखेरीज राहणार नाही. अलीकडे लोकांची खाण्यापेण्याची लालसा वाढली आहे. पूर्वीचा एकभुक्त राहण्याचा, किंवा निवळ दोन वेळ भोजन करण्याचा प्रघात आतां बहुधा गेला आहे. प्रवासांत दिवसचे दिवत-धार्मिक समजुतीने म्हणा, किंवा कडक सोंवळ्याओवळ्याच्या कल्पनांनी म्हणा उपास काढण्याचा प्रचार मोडला आहे. आगबोटींत व आगगाडीत ब्राह्मण-मंडळी सुद्धां महाराच्या मांडीला मांडी लावून नाहीं-तरी अस्पृश्यांच्या स्पर्शाचा विधिनिषेध मनांत न आणतां यथास्थित फराळ करतांना दृष्टीला पडतात. पण या खाण्यापिण्याच्या लालसेबरोबर खाल्लेले पदार्थ पचविण्याची शक्ति मात्र बरीच कमी झालेली दिसते, किंवा ती वाढलेली तरी नाही. यामुळेच सकस अन्न अलीकडच्या मंडळीला पचत नाही व मग अर्थातच ते पचविण्याकरतां त्यांना पाचक औषधांचा आश्रय करावा लागतो. खावयाची तर हौस आणि खाल्लेले पचत तर नाही ! तेव्हा अगदी पचलेले हलके अन्न तरी खावे, किंवा सकस अन्नाला पचविणाऱ्या औषधांचा आश्रय तरी करावा, अशी स्थिति झाली आहे.

 जशी शरीराला ही गोष्ट लागू आहे, तशीच अलीकडील मंडळीच्य मनालाही लागू आहे. ज्याप्रमाणे खाण्यापिण्याची हौस वाढली आहे, पण त्याबरोबरच अग्निमांद्य वाढले आहे, त्याचप्रमाणे आमच्यांत अलीकडे वाचनाभिरुची वाढली आहे, पण त्याबरोबरच मनोमांद्यहि वाढले आहे. गेल्या पांचपंचवीस वर्षांत देशांत शिक्षणाचा प्रसार झपाट्याने झाला