पान:तीन तत्वज्ञानी.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन तत्त्वज्ञानी.

भवावरून परमेश्वरविषयक भावना मनांत उत्पन्न होते असे कॅटने या ग्रंथांत प्रतिपादन केले आहे.

 तात्पर्य, कॅटचे नवे तत्वज्ञान जरी अज्ञेयवादी आहे असे प्रथमदर्शनी वाटले तरी त्या तत्वज्ञानाचा सर्व रोख परमेश्वराचे व आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करण्याकडे आहे यात शंका नाही. कँटचे म्हणणे थोडक्यांत असें सांगतां येईल; परमेश्वर किंवा आत्मा आपल्याला दृष्टीने दिसत नाही. कारण हे पदार्थ उघड उघड अतींद्रिय आहेत, तेव्हां परमात्मा व जीवात्मा बुद्धिगम्य आहेत व बाह्य जगाप्रमाणे आपल्याला त्यांचे अस्तित्व कळते अशा तऱ्हेचचा आग्रह धरण्यांत अर्थ नाही. येथें अज्ञेयवादच पतकरणे श्रेयस्कर आहे. कारण, परमेश्वर आम्हांला कळत नाही. आमच्या आटोक्याबाहेरचा तो विषय आहे इतकें सिद्ध झाले तर निदान जडवाद्यांचे किंवा नास्तिक्यवाद्यांचे तोंड बंद होते. याप्रमाणे दोघांची तोडे बंद केल्यावर आपल्याला नीतिशास्त्राचा व नैतिक अनुभवाचा आश्रय करावयास सांपडतो. या नैतिक अनुभवावरून आपली परमेश्वराच्या व आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल सकारण व विवेकी श्रद्धा उत्पन्न होते; नव्हे सौंदर्यविषयक भावनांनी तर परमेश्वर साक्षात् आपल्याला भासमान होतो, म्हणजे जरी परमेश्वर मानवी मनाला कळत नाही; तरी त्यावर श्रद्धा बसते व जणू कांहीं तो आपल्यापुढेच उभा आहे असा भासतो. इतकेच आपल्याला परमात्म्याबद्दल समजते. पण हे समजणे काही थोडे नाही. त्याने आपण धर्मपरायण व नीतिपरायण होण्यास हरकत नाही व अशा तऱ्हेनें तत्वज्ञानाचा विकास केल्यास नास्तिक्याचा व जडवादाचा जगातून नायनाट व्हायला हरकत नाही. हे कॅटच्या शिकवणीचे सार होय व म्हणूनच कॅटचे तत्वज्ञान सर्व युरोपभर पसरले व कॅट हा तत्वज्ञानांतील क्रांतिकर्ता बनला.

समाप्त
११६