पान:तिच्या डायरीची पाने.pdf/८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कायदा मदत, मोफत शिवण प्रशिक्षण, प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पायावर उभे राहण्यासाठी उसनवार आर्थिक मदत आदी सोयी असताना, प्रशिक्षण पूर्ण करायचे सोडून यांना दोनशे रुपयांची नोकरी करण्याची हौस का आली हे आम्हालाही समजेना. आम्हीही मग त्यांच्याशी मोकळेपणी गप्पा मारल्या. त्यातून बरेच धागे उकलले. आम्हीही नवे शिकलो. दिलासाघरातील शिस्त त्यांना कधी कधी नकोशी वाटे 'घरा'चा ऐसपैस मोकळेपणा त्यांना मिळत नसे.
 "मम्मी लईच कडकड करती नि धाक घालती. एका दिवशी जरा उशीर झाला उठायला तर काय होतं? रविवारी बी फाटेच उठायचं का" एकीची तक्रार.
 "भाभी, आपल्या दिलासाघरात फक्त सहा जणींना आधार द्यायची सोय आहे. आता आमी आठ जणी आहोत. मग अडचणीत असलेल्या बायांची कशी सोय व्हावी? म्हणून मीच नेलं सगळ्यांना मुनशीपालटीत. विवेकसिंधूत जाहिरात वाचली होती. म्हटलं तिघीजणींना नोकरी मिळाली तर, एकत्र राहून, घरून थोडीफार मदत घेऊ. पण स्वतंत्रपणे राहूं. एकत्र राहिलं तर कुणाची टाप आहे तरास देण्याची?" निर्मला शांतपणे सांगत होती.
 "हितं राहिलं की मम्मी सारखी बडबडते की आयतं मिळतं खायला, पण तुम्हाला चव नाही. हितं रहाणं म्हणजे दिल्या अन्नावर जगणं. मला आता सही करता येते. थोडं वाचताबी येतं. शिवणवी शिकलेय मी. बघू तर खरी सोवतंत्र राहून. न्हाईतर येऊच की हितं" हंसा बोलली.

 हे वोलणे मलाही खूप काही शिकवून गेले. विचार करायला लावून गेले. मम्मी जुन्या काळातल्या. त्या सर्वावर अपार माया करतात. पण बोलण्यात थोडफार शिव्यांचा झिडकावा असतो. त्यांनाही समजावून सांगावे लागले की दिलासाघरातील महिलांना संस्थेकरवी दिले जाणारे सहाय्य म्हणजे उपकार वा दान नव्हे. सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, संस्थेत कार्यकर्त्या म्हणून आलेल्या महिला आणि दिलासाघरातील महिला सगळ्याच एकत्र राहातात. सर्वांसाठी सारख्याच सोयी असतात. पण इतकी मंडळी एकत्र रहायची म्हणजे नियम, त्यांचे पालन आदींवर भर द्यावाच लागतो. वसतिगृहातील मुली आणि कार्यकर्त्यांना या शिस्तीची गरज माहीत असते. पण घरगुती, तेही जाचक अशा वातावरणातून आलेल्या दिलासाघरातील महिलांना या शिस्तीची कधी कधी अडचण वाटे.

निर्मला
७९