पान:तिच्या डायरीची पाने.pdf/७४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हिंडता येणार … मैत्रिणीकडे जाता येणार … शेतात फेरी मारायला आडकाठी नाही… सारे कसे मोकळे नि छान. पाहातापाहाता वर्ष निघून गेले.
 लग्नात ११००० रु. रोख, तीन तोळे सोने, वधू वराचे कपडे, मानपान, दोहोकडचा खर्च, एवढे सारे करूनही निर्मलाच्या सासरच्यांची भूक भागलेली नव्हती. वर्षसणाच्या निमित्ताने मोटारसायकल माग असा लकडा त्यांनी मुलामागे लावला आणि मग निर्मलाला मारहाण करणे सुरू झाले. सासू-सासरे, नणंद यांचे कुजकट वोलणे तर नेहमीच सहन करावे लागे. निर्मला पैसे आणण्यासाठी माहेरी जाण्याचे नांव काढीत नाही असे पाहून ९ ऑक्टोबर १९७८ रोजी तिच्या वडिलांना 'निर्मला मरण पावली' अशी तार केली. तात्काळ आई-वडिल रडतभेकत औशाला आले तर तिथे निर्मला समोर दिसली. कारण विचारताच मुलींची नांदणूक व्हायची असेल तर मोटारसायकल द्या अशी मागणी केली. निर्मलाच्या वडिलांनी नाइलाजाने ४ एकर जमीन विकली आणि जावयाला ४००० रु. दिले. उरलेले पाच हजार रुपये लवकर देतो असा हवाला दिला. परंतु ते वेळेवर देणे जमले नाही. मारहाण, शिवीगाळ यांच्या वर्षावात निर्मला मुकाटयाने आला दिवस पार करीत होती. दोन वर्ष निघून गेली. निर्मलाच्या नवऱ्याने जवळच्याच खेड्यातील मुलीशी दुसरा विवाह केला. नवी नवरी निर्मलाच्या सासूची लांबची भाची म्हणून घरात आली.
 निर्मलाला ताकीद दिली गेली की, सवतीची ओळख मावसनणंद म्हणून करून द्यायची. जर तिने खरी गोष्ट सर्वांसमोर आणली तर तिचे तुकडे करून टाकले जातील असा सज्जड धाकही घातला. दरम्यान निर्मलाचे सासरे पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले व त्यांनी आपल्या मुलास सुधाकरास पोलीस खात्यात नोकरी द्यावी यासाठी खटपट केली. त्यास यश आले आणि सुधाकरची पोलिस प्रशिक्षणासाठी निवड झाली.

 निर्मलाव्यतिरिक्त सारे घर सुखात होते. मुलाची पोलीस भरतीत निवड झाली. त्याला दुसरी बायकोही मिळाली. आता निर्मलेची अडचण मात्र सर्वांना जाचू लागली. तिचा खंगलेला चेहरा, खाली पाहून निमूटपणे काम करत राहण्याची वृत्ती, सतत रडणारे डोळे पाहून सासऱ्याला वाटले की हिला पहाटे मारहाण करून हाकलून दिले तर ती एखादी विहीर गाठील नि प्रश्न सुटेल. पण झाले वेगळेच.

निर्मला
६९