पान:तिच्या डायरीची पाने.pdf/७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अंधारकोठडीची भीषण कहाणी नोंदवली गेली होती. त्या वर्षीच्या गणेशोत्सवात तिची कहाणी सांगणारे करुण देखावे मांडले गेले होते. अशी निर्मला, वडिलांच्या घरून संस्थेत येऊ इच्छित होती. का? ते तर तिचे माहेर होते. तिथेही ती उपरी होती का? दुसऱ्याच दिवशी मोठया बहिणीला बरोबर घेऊन ती संस्थेत दाखल झाली. दवाखान्यात होती तेव्हा डोक्याचा पार गोटा होता. गेल्या चार महिन्यात डोईवर थोडे काळे केस आले होते. डोक्यावर पदर घेतला तरच तिच्याकडे बघवत असे. एरवी काळजात घालमेल व्हावी असा अवतार. सतत रडून रडून डोळ्याभोवती काळेपणा आलेला. सूज आलेली. एका डोळ्यात फूल पडले होते. हाताची कोपरे आणि पायाचे गुडघे सतत त्यावर लोखंडी बत्ता मारल्याने हिरवेनिळे पडलेले होते. मुळात चांगली उंची नि दुहेरी हाडाचा बांधा. पण आता एवढी काटकुळी झाली होती की फुंकर मारल्यावर उडून जावी! तिचा हात मम्मीने हातात घेतला. पाठीवरून हात फिरवला. आणि दोघींचे डोळे भरभरून वाहू लागले. आमच्या, नेहमीच्या रीतीनुसार दोनतीन दिवस तिला फारसे प्रश्न विचारायचे नाहीत आणि दिलासाघरातील वातावरणात मिसळून जाण्यास मदत करायची असे ठरले. आणि दोनच दिवसात मनाच्या सगळ्या कड्या उकलल्या. मोकळ्या झाल्या. तिच्या चेहऱ्यावर तरतरी आली. दिलासाघरात आलेली महिला आमच्यात मिसळून जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची मदत होते ती मम्मींची. मम्मीचे नाव गंगाबाई. वयाच्या नवव्या वर्षी लग्न झाले आणि सालभरात नवरा खर्चला. वैधव्य आले. तेव्हापासून दिराच्या नाहीतर भावाच्या दारात कष्ट करून, दिल्या अन्नात आनंदी रहायचे ही हजारो वर्षापासून चालत आलेली रीत गंगाबाईनेही पाळली. दुसरे काय होते हातात? १९७५ चा सुमार. डॉ. लोहिया 'आणीबाणी' वासी होते. १९ महिने गजाच्या आड. आणि नेमक्या त्याच काळात संस्थेला बालसदन चालवण्याची परवानगी मिळाली. माझ्या नजरेने या मम्मीला केव्हाच हेरून ठेवले होते. आणि दिवाळीत गंगाबाई ९ बालकांच्या मम्मी झाल्या. गेल्या पंचवीस वर्षापासून त्या मानवलोक परिवाराच्या मम्मी... मायमाऊली झाल्या आहेत. हजारोंच्या पोटात मम्मीचे प्रेमळ हात पोचले आहेत. आमची अडाणी मम्मी अनुभवातून खूप काही शिकली. अनुभवातून सुदृढ आणि सुजाण झालेला तिचा मायेचा आधार दिलासातील मुलींना अधिक मोकळं करतो. अधिक बोलकं

निर्मला
६७