पान:तिच्या डायरीची पाने.pdf/६८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पापड आवाज न करता, तोंडातल्या तोंडात खायचा. शिळी भाकरी आवडीने खायची. जाता येता खायचे नाही. या साऱ्या गोष्टी तिने लहानपणापासून शिकवल्या. थेंवभर दुधाचा चहा अधून मधून प्यायला लावी. का तर सासरच्या हालाची आताच सवय हवी…
 …मेंदूचा डबा बुडाशी भरलेला असतानाच झाकण गच्च बसवून टाकले. तो डबा कधी भरलाच नाही. पण इथे दिलासात आल्यापासून क्षणोक्षणी विचार करायला शिकले. मोर्चात सामील झाले. जगात काय घडतंय, देशात काय घडतंय हे वाचण्याची संधी मिळाली. मला वाचनाची खूप आवड पण पुडीचा कागद वाचू लागले तरी पिताजी रागवत. शिकलेल्या बाईचा संसार चांगला होत नाही असे ते म्हणत. पण इथे आल्यावर मेंदूच्या डब्याचे झाकण कधी मोकळे झाले आणि उघडले ते कळलंच नाही. माझ्यापेक्षाही दुःखी, अडचणींना व अत्याचारांना बळी पडलेल्या मैत्रिणी भेटल्या. त्यांच्याकडे पाहून माझे दुःख फिके वाटू लागले आहे. आहे त्या परिस्थितीला तोंड देण्याची हिंमत माझ्यात आली. स्वतःच्या कष्टाने घर उभारण्याची जिद्द उभारली.
 पण तरीही… भाभी, लहान वयात झालेले संस्कार..तेव्हा मिळालेली शिकवणूक अंगावर उठलेल्या फोडांसारखी असते. फोड फुटून बरा झाला तरी वण कायमचे राहातात. मनाला कितीही पटले तरी व्रत वा उपवास केल्याशिवाय आंघोळ केल्यासारखे वाटत नाही. भाभी, कुणी सांगावं, आणखीन पाचदहा वर्षांनी हे वणही साफ होतील.
 एवढे रामायण घडून गेल्यावर, मी जेव्हा नव्याने घर उभारीन ते माझे नि मुलांचेच असणार. मुलांच्या पप्पांनी यायचे तर जरूर यावं. पण, माझ्या घराच्या चौकटी मान्य करून. एकोणनव्वदच्या अखेरीस आलेली नंदा नव्वदच्या ऑगस्टमध्ये बोलणाऱ्या केतनला घेऊन माघारी धुळ्याला गेली. आज तिथे घर उभे आहे. जीवनधरला त्या घराच्या भिंती भावल्या नाहीत. तो त्या घरात आला नाही. आज नंदा दुकानात काम करते. उरलेल्या वेळात फॉल पिकोचे काम करते. अधूनमधून पत्र येते. त्यात लिहिलेले असते-

 "मेरा और केतनका ऑल मानवलोक फॅमिली को धुलीया से अंबाजोगाई तक साष्टांग प्रणाम पहूँचे. मेरे घर आना.

नंदा
६३