पान:तिच्या डायरीची पाने.pdf/६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दु:ख होते तर कशाला हे गाणे म्हणायचे? असे मी म्हणताच मला नंदाने उत्तर दिले होते, "भाभी, हे गाणं म्हणताना विहिरीला पाण्याचे फुटवे फुटतात ना तसे डोळ्यातून पाणी वाहाते. पण त्यामुळे मन खूप शांत होते. काही नवे करण्याची इच्छा पण जागी होते."
 आजही खिचडी करताना मम्मीला नंदा आठवतेच. तिच्या खिचडीत वांगी नि बटाटे असणारच. कढीसाठी पीठ दळून आणताना त्यात पसाभर उडीददाणे नि वाटीभर धणे भाजून घालणारच. शिवाय फोडणीत चार मेथीदाणे टाकायला तिनेच नकळत शिकवले.
 नंदा दिलासात असतानाच जीवनधरचे पत्र आले. पहिल्या वाक्यातच "आय लव्ह यू, डू यू लव्ह मी?" असा प्रश्न होता. नंदाची समजून घालण्याचा त्यात प्रयत्न होता. दुसरी वाई सोडून गेली होती. मुलाला भेटण्याची आग्रही विनंती पत्रात होती. पण त्यातील एकाही अक्षराने नंदा विचलित झाली नाही. ती म्हणे की मी गेली आठ वर्षे या थापांना भुलले. जिवावर दगड ठेवून, मुलांच्या भल्यासाठी घराबाहेर पडले. त्याला यायचेच असेल तर धुळ्यात यावे. नंदाच्या कुटुंबात, घरात राहावे. कामधंदा करावा, दारू, जुगार, पत्ते चालणार नाही. आता घर नंदाचे, तिच्या मुलाचे असेल. ही तिची ठाम भूमिका होती.
 ज्येष्ठी पौर्णिमेस नंदाचा उपास होता. मी न राहवून विचारलंच, "नंदा, आम्हाला पत्ता लागू न देता वटसावित्रीचा उपवास करतेस. करवी चौथ केलीस. तीजेला पिंडा करून, केतनच्या हाताने तो कापून सार्वाना देतेस. मग जीवनधरकडे जायचे नाही असे का म्हणतेस?"....मी विचारले.

 दिलासाघरात येईपर्यंत नवऱ्याच्या जाचाला आणि माराला कंटाळलेल्या मनातही 'पती हाच परमेश्वर' हे वाक्य गोंदलेले होते. माझी आई मला इथे येईपर्यंत जतावून सांगत होती की, नंदू तुझ्या पतीची बुद्धी काही काळापुरती फिरली आहे. पण हनुमानजी त्याला परत ठिकाणावर आणतील. तुझा परमेश्वर तुझा पतीच. त्याला दुवा देत जा. मला कळायला लागले तेव्हापासून, पती हाच देव आणि त्याच्या दारात, पती आगोदर मरणारी बाई सर्वात भाग्यवान हेच ऐकलेले. जोरात बोलले वा दणदण पाय वाजवीत चालले की आई ओरडे. ए हलक्या आवाजात बोल. सासरी अशी वागलीस तर आमची अब्रू बाहेर टांगशील.

६२
तिच्या डायरीची पाने