पान:तिच्या डायरीची पाने.pdf/६५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाण्याचा प्रसंग दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने येणार. सुनांना तर हातभर घुंगट काढून तिथे जाता येई. लेकींची बात मात्र न्यारी. त्यांना कुठही प्रवेश असे. त्याही सठीमासी चार दिवस येत. माहेरी मनभरून श्वास घेऊन परत सासरी जात. तर असे हे भोवताली वातावरण. घरातल्या स्त्रियांना मोकळेपणी जाता येण्यासारखे ठिकाण म्हणजे हनुमान मंदिर. घरात भांड्याला भांडे लागून आवाज होणारच. असे आवाज झाले की सासवा नाहीतर सुना नंदाच्या आईकडे येत. निमित्त मंदिरात जाण्याचे. तेथे चार घरच्या चार जणी जमत. गप्पा रंगत. अर्थात गप्पा घराच्या चौकटीतल्या. हिने हे केले, तिने ते केले. ही अशी, ती तशी. कुणाचे सासरी पटत नाही, कुणाच्या नवऱ्याचं लफडं कुठे आहे. वगैरे.. वगैरे. अशा वातावरणात नंदा माहेरी चार महिने राहाताच, आडून विचारणे सुरू झाले, "इत्ता दिन क्यान रख्या ससुरालवालोंने? ठिक तो चल्यो होना?"
 हा प्रश्न अनेकांच्या तोंडून येण्याआधीच नंदाने चारसहा महिन्यासाठी एखादा व्यवसाय शिकण्यासाठी इतरत्र जाण्याची इच्छा विजयाताई चौकांकडे व्यक्त केली. आणि त्यांनीच तिला मनस्विनी महिला प्रकल्पाच्या दिलासाघरात केतनसह पाठविण्याचा निर्णय घेतला. तिच्या केतनची जीभ थोडी जड होती. ऐकू चांगले येत असे. त्यामुळेच तो चांगले बोलू शकेल अशी आशा वाटे. केतनला उपचार करण्यासाठी परगावी नेले आहे अशी हूल उठवून नंदा अंबाजोगाईत पोचली.

 आल्या दिवसापासून ती सर्वांच्याच मनात शिरली. ती आली त्याच वेळी संस्थेच्या स्वयंपाकघरात डिझेल आणि लाकडाच्या तुकड्यांपासून तयार होणाऱ्या गॅसवर चालणारी शेगडी आणली होती. लाकडाचे तुकडे तयार करण्याच्या हात यंत्रावर काम करण्यास दिलासातील महिला तयार नसत. खरे तर ते काम युक्तीचे होते, शक्तीचे नव्हते. पण युक्ती समजावून घ्यायला लागते. त्यासाठी मन स्थिर लागते. ठेंगणी नंदा हे काम हौशीने आणि सफाईने करी. फॉल लावणे, पिको करणे हे काम ती सहजपणे शिकली. शिवणकाम, भरतकामात तरबेज झाली. केतनला जिभेसाठी डॉक्टरांनी विशिष्ट व्यायाम सांगितला होता. तसेच ठराविक जागी चोळायला सांगितले होते. नंदा हे सारे नियमितपणे करी. केवळ केतनकडेच नाही तर दिलासातील इतर महिलांच्या मुलांकडे ती लक्ष देई.

६०
तिच्या डायरीची पाने