पान:तिच्या डायरीची पाने.pdf/६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गृहिणी पौराणिक किताबोंमेही होती है. स्वतःच्या नवऱ्याला वेश्येच्या दारात नेऊन घालणारी पतिव्रता पत्नी आणि अतिथीला पोटच्या लेकराची भाजी करून खाऊ घालणारी आदर्श गृहिणी पुराणातल्या गोष्टीतच भेटतात. त्या 'माणूस' नसतातच. पण माणसाचे शरीर धारण करणाऱ्या आम्ही. त्यांचे कसे अनुकरण करायचे? नि का करायचे?"
 नंदा व तिच्या बहिणीने विचारपूर्वक निर्णय घेतला. मोठ्या मुलीला सांभाळण्याची जबावदारी बहिणीने घेतली. धाकटा केतन आणि मधली वैशाली यांना घेऊन नंदा धुळ्याला आली. नंदाने नवऱ्याचे घर सोडून कायमचे माहेरी येणे वडिलांना पटले नाही. परंतु भाऊ आणि आई यांनी तिची बाजू उचलून धरली. वडिलांनी जावयाला पत्र पाठवून चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. नंदाच्या भावाला त्याला आणण्यासाठी सुरतेला पाठवले. पण जावयाला पैशाची धुंदी चढली होती. तो दुसऱ्या लग्नाची भाषा अधिक जोरात बोलू लागला.

 नंदा सातवीपर्यंत शिकलेली होती. समज चांगली होती. स्वतःच्या पायावर उभे राहून मुलांना शिक्षण द्यावे असे तिला मनापासून वाटे. हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या कारागिरांबद्दल तिला सहानुभूती वाटे. ती म्हणे, हिऱ्याला पैलू पाडणाऱ्यांना पैसा भरपूर मिळतो. पण त्या माणसाचे डोळे अर्ध्या वयातच निकामी होतात. ऐन चाळिशीत अनेकजणांना धंद्यातून बाहेर पडावे लागते. पैसा आला की बारा वाटांनी निघून जातो. वाईट सवयी पैशाच्या नादाने लागतात. मग त्यांच्या मुलांनाही तरुण वयात शिक्षण सोडून वडिलांच्या धंद्यात पडावे लागते. तिला आपल्या मुलांना या धंद्यापासून दूर ठेवायचे होते.
 धुळ्यात आल्यावर विजयाताई चौकांबद्दल तिने ऐकले. ती त्यांना भेटली. त्यांना सहकार्य करणाऱ्या वकील ताईना ती भेटली. वडिलांच्या आटोकाट प्रयत्नांमुळे जीवनधर एकदा धुळ्याला आला. पण त्याला दुसरीशी लग्न करायचे होते. नंदाने घटस्फोटाला मान्यता दिली तरच तो मुलांच्या नावाने दोन पाच हजार बँकेत ठेवणार होता. अर्थात नंदाने व तिच्या भावाने त्याला नकार दिला. पाचसहा महिने धुळ्यात माहेरी काढल्यावर नंदाही खूप अस्वस्थ झाली. तिची अडचण सामाजिक व मानसिक होती. भोवताली व्यापाऱ्यांची वस्ती. स्त्रियांना पुढच्या बैठकीत येण्याची परवानगी नसे. बहुदा तिथे दुकान थाटलेले असे, तिथे

नंदा
५९