पान:तिच्या डायरीची पाने.pdf/६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


तीन गज की ओढनी....


 वयाची पन्नाशी उलटून गेली तरी माहेरच्या दिशेने ओढ घेणारे मन कधीच वयस्क होत नाही. आईवडिलांच्या निर्व्याज प्रेमाची शाल, त्यांचा सहवास पन्नाशी उलटेपर्यंत लाभला. तर, माथ्यावरचे केस चंदेरी झाले तरी अंगभर बालपण हुंदडत राहाते. मी त्या वाबतीत भाग्याची. कालपरवापर्यंत आई-पपा होते. त्यांना भेटायला धुळ्याला जाताना, तिरवीच्या तलावाभोवतालचा हिरवा डोंगर लागला की माझे मन थेट घराच्या पायऱ्या चढत असे. भर उन्हाळ्यातही खानदेशी गरम वारे तनामनातला वसंत फुलवीत. आई खूप आजारी होती. मी पळतच तिथे पोचले. चार दिवस निवांतपणे राहिले. आता माहेरी गेले की बाजारात भटकणे आलेच. बॉम्बे कटपीस सेंटर हे आमचे गेल्या २०/२५ वर्षापासूनचे लाडके दुकान. तिथे जाऊन तऱ्हेतऱ्हेच्या कापडांचे तुकडे निरखण्यात नि त्यातून हवे ते तुकडे निवडण्यात दोन तास दहा मिनिटांगत अपुरे पडत. त्याही दिवशी पाय त्या दुकानाकडे वळले. पण दुकानाचा बाज आता पार बदलला होता. कटपीसचे दुकान एका तुकड्यात बसवले होते आणि उरलेल्या मोठ्या भागात तयार कपड्यांचा देखणा विभाग थाटात उभा होता. सुरेख झगे दिसले म्हणून आत शिरले. एक झगा न्याहाळते आहे तोच खूप आनंदाने रसरसलेली हाक ऐकू आली. 'भाभी!! दीदी!! तुमी? कवा आलात?" माहेरच्या अंगणात मला भाभी म्हणणारी कोण असा विचार करीत आवाजाच्या दिशेने नजर टाकली तर काजळभरल्या डोळ्यांनी टवटवीत नंदा मला हाक मारीत होती. काही उमजायच्या आत धावत येऊन कडकडून भेटलीही. नि तेवढ्या गर्दीत 'पाँव लागू' ही झाले. मग अंबाजोगाईतील सर्वांची खुशाली विचारली. नंदाच्या आवाजातला नम्र गोडवा खूप खूप दिवसांनी ऐकायला मिळत होता. तोच गोडवा

५६
तिच्या डायरीची पाने