पान:तिच्या डायरीची पाने.pdf/४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि कडक कार्यकर्त्यांच्या दृष्टीने हा गुन्हा महाभयानक. मग जेवण न देण्याची शिक्षा केली जाई. मीराही इतकी हेकेखोर की ताईनी-कार्यकर्तीने 'जेव' म्हटल्याखेरीज घास तोंडात घालणार नाही. पुस्तकी शिस्तीपेक्षा मायेचा मऊ हात अधीक महत्त्वाचा असतो हे कार्यकर्तीला समजावून सांगताना माझी तारांबळ उडे. त्यातूनच मग मीराला माझ्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. राखी पौर्णिमेला निरांजन ओवाळून, साग्रसंगीत राखी बांधण्याचा कार्यक्रम फक्त दादाभैय्यापुरताच नसे तर आमच्या बालसदनच्या मुक्तारलाही सन्मानाने राखी बांधली जाई.
 पेपर वाचण्याचाही नाद होता. पुण्याला कोणते सिनेमे लागलेत ते या बाईला माहीत असत. त्यातूनच तिला चौथीला बसवण्याचे मला सुचले. आणि पहिल्या वर्गात पासही झाली. मीराचा मामा तिला भेटला नसता तर कदाचित ती आणखी शिकली असती. मीरा आसाममध्ये असताना सविता दीदींच्या सुखवस्तू घरात राहिली. सुशिक्षित आणि स्त्रीपुरूष समतेचा विचार स्वीकारलेल्या घरात तिला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व मिळाले. तरूणाईच्या उंबरठ्यावर पहिले पाऊल ठेवताना सुखी संसाराचे चित्र जवळून पाहिले. त्यामुळे त्या अधमुऱ्या वयात तिच्या मनानं. सुखी संसाराबद्दल, प्रियकर… साथीदाराबद्दल सुंदर स्वप्ने पेरली गेली. लातूरला झोपडीतले दरिद्री जीवन जगताना मुर्तझासारखा दिसण्यात तेज, थोडाफार शिकलेला, तिच्या सौंदर्याची स्तुती करणारा मित्र भेटला, परंतु त्याने चार दिवस तिच्या सौदर्याचा उपभोग घेऊन तिला सोडून दिले. एका बाजूने पारंपारिक संस्कारांच्या मुशीत वाढलेल्या मीराला हा धक्का सहन झाला नाही. आईवडिलांकडे परत जाण्याची हिंमत झाली नाही. दिलासाघरातल्या वातावरणात ती आरपार रमली होती. मीराला निरोप देताना आम्ही सारेच आतल्याआत हेलावलो होतो.
 कोणत्याही संध्याकाळी मीरा आठवते नि मनात येते, मीराच्या हातातल्या चुडियाँ कनखत असतील का? तिचा सजन तिला सापडला असेल? का उजाड शुष्क डोळ्यांचे बिनबांगड्यांचे हात दारोदारची धुणीभांडी करण्यात निष्पर्ण, राठ, . भेगाळ बनत चालले असतील?

३६
तिच्या डायरीची पाने