पान:तिच्या डायरीची पाने.pdf/३९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कामासाठी घरी ठेवावे. माझ्या मुलीबरोबर तिची दोस्ती होतीच. सायंकाळी जेऊन खाऊन दिलासात परतावे. त्या बदल्यात मी जेवण, कपडे वगैरे देऊन दीडशे रुपये तिच्या नावे बँकेत भरावेत. घरगुती वातावरणात ती अधिक स्थिर होईल. मीरा मला घरात मदत करी. घर स्वच्छ ठेवणे नि मला स्वयंपाकात मदत करणे एवढेच तिचे काम. दुपारी २ ते ४ संस्थेत शिवण शिकायला मी पाठवीत असे. १९९० साल 'युनोने' बालिका वर्ष म्हणून जाहीर केले. त्या निमित्ताने बालिका मेळावे घेतले. त्यात मीरा पुढे असे. अंताक्षरीत तर कोणालाच हार जात नसे.
 केव्हातरी बाजारात जाताना तिला तिचा मामा भेटला. त्याने नंतर संस्थेत पत्र पाठवले. मीराची आई सावत्र नव्हती तर सख्खी होती. मुर्तुझाबरोबर पळून गेल्यावर ती परत घरी कधी गेलीच नव्हती. आम्हाला सांगितलेल्या माहितीतल्या अर्ध्या गोष्टी खोट्या होत्या. एक दिवस सायंकाळी आईवडिल संस्था शोधीत आले. मीराला परत घेऊन जाण्यासाठी. मीराला त्यांच्यावरोबर परत जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. तिने काही गोष्टी मीठमसाला लावून सांगितल्या होत्या. आठ बहिणी नव्हत्या. होत्या सहाजणी. मोठीने आसामात टेलरकाम करणाऱ्याबरोबर लग्न केले होते. मीराचा नंबर तिसरा. तिच्याहून मोठी मीना. तिचे लग्न गेल्यासाली झाले. मीराला नटामुरडायची खूप हौस. ते आईला आवडत नसे. त्यात ती ज्या घरी कामाला जाई तिथे हातउचल करी. मुर्तुझा हा शिकणारा मुलगा नव्हता. तो कुठल्याशा फॅक्टरीत फिटरचे काम करत असे. तो नांदेडचा होता. दिसण्यात देखणा होता. त्याच्याशी मीराची असलेली जवळीक आईवडिलांना आवडत नसे. त्यातून मुसलमान मुलगा आपल्या पोरीला बिघडवतो याचा राग येई. दोघेही मीराला खूप मारत. पण तिच्यातला धट्टपणा कमी झाला नाही.
 मीरा पळून गेल्यावर तिचा शोध घेण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी केला नाही. बला टळली असेच वाटे. पण आठवण मात्र येत राही. शेवटी पोटची लेक. तिचा पत्ता लागल्याचे भावाकडून कळताच आईने उचल खाल्ली. लेकीला भेटावं असा हेका धरला.

 आणि ते संस्थेत आले, "ताई, सख्खे आईबाप झाले म्हणून काय झालं? इतकं मारतात का पोरीला? कंदी तरी मायेनं पोटाशी घेतलंय का मला? विचारा

३४
तिच्या डायरीची पाने