पान:तिच्या डायरीची पाने.pdf/३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मीराचे केस कुरळे नि दाट होते. डोक्यावरून पाणी घेण्याची सवय आसामात लागलेली. मोकळे केस पाठीवर टाकून हिंडणारी.... काम करणारी मीरा अनेकांच्या नजरा वळवून घेई. त्यातच मुर्तुझा होता. तो तिला डोक्याच्या पिना, डोळ्यात घालावयाचा सुरमा, भिवया रेखायची पेन्सील, पावडर इत्यादी खास वस्तू आणून देई. मग घरात दुसरी पोरं नसतील तेव्हा त्याचे हट्ट मीराला, पुरवावे लागत. सवितादीदीच्या घरात वाढल्याने स्त्रीपुरुष मैत्रीतले नेमके धोके तिला माहीत होते. ती शहाणी झाल्यावर दीदींनी तिला चार गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. चित्रं दाखवली होती. मुर्तुझाचे बारीकसारीक हट्ट पुरवताना एक दिवस आईनेच पाहिले. त्या रात्री वडिलांनी मरेस्तो मारले. आईने दोन दिवस उपाशी ठेवले. अर्थात मुलांचे कामही बंद करून टाकले. घरची देखभाल मीरावर सोपवून आई खोकत खाकत चार घरची धुणीभांडी करू लागली. चार आठ दिवस बरे गेले. आई बाहेर कामाला गेली की धाकट्या भावंडांच्या हातावर चॉकलेट, गोळ्या देऊन मीरा मुर्तुझाची खोली गाठे. तोही वाट पाही. खोलीतली बाकीची मुले गावी निघून गेली होती. हा मात्र मीराच्या ओढीने लातूरला राहिला होता. धाकट्या भावाने, बालाजीने एक दिवस आईजवळ कागाळी केली. त्या रात्री तर मीराला बापाने इतके बडवले की शेजारच्यानी सोडवले. मुर्तुझाला त्याच्या मालकाने खोली मोकळी करायला लावली. बापाला वाटले की पोरगी आता तरी ठिकाणावर येईल. मुर्तुझाने शेजारच्या झोपडपट्टीत एका मित्राच्या मदतीने खोली केली. एक दिवस मीरा घरातून नाहिशी झाली. दोघांनी सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊन एकमेकांना माळा घातल्या. भांगात सिंदूर, पायात बिछड्या, हातात चुडा, त्यात सवितादीदींनी दिलेली शंखाची बांगडी अशा थाटात मीरा संसाराला लागली. मुर्तुझाही मजुरी करी, दोन वेळचे भागे. जेमतेम महिना झाला असेल नसेल लग्न करून. एक दिवस मुर्तुझा काम शोधायला गेला तो परतलाच नाही. आठ दिवस गेले. एक रात्री त्याचा मित्र आला. वेडंवाकडं बोलू लागला. त्याच्याजवळ मीराने राहण्याची भाषा करू लागला. मीरा संतापली, आरडाओरडा करून तिने चार माणसे गोळा केली. पण साऱ्यांनी तिलाच दोष दिला.

 "बगा ताई समदे माझ्या तोंडावरच थुकले. ही पोरगीच चवचाल आहे

३२
तिच्या डायरीची पाने