Jump to content

पान:तरंग अंतरंग.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असला तर पुढे काय होईल, असल्या चिंता मग सतावायला लागतात. एका बाजूने भूतकाळातल्या चुका आणि दुसऱ्या बाजूने भविष्यातल्या काल्पनिक समस्यांची भीती, या दुहेरी कात्रीत सापडून बहुतेक बायका मग आपलं वर्तमान पार हरवून टाकतात. स्वतःकडे, स्वतःच्या आवडी-निवडींकडे, आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात. त्यामुळं अजूनच रितं, भकास वाटू लागतं. आपल्याला मनाच्या अंगणात नाचणारा मोर तर हवा असतो, पण त्यासाठी आपणच मोर व्हायचं असतं हे मात्र बऱ्याच बायका पार विसरून जातात. आपल्या नवऱ्यावर, मुलांवर, इतर सुहृदांवर प्रेम करताना आपण आधी आपल्यावरच प्रेम करणं गरजेचं असतं. दुसऱ्यांना भरभरून देताना आपण आपल्याला समृद्ध करत राहायचं असतं. नाही तर आपल्याजवळ आहे, ते इतरांना देऊन देऊन कधी ना कधी तरी रितेपणाचा अनुभव मनाला ग्रासून राहणारच असतो. 'चाळिशीतल्या स्त्रीचे आत्मभान' हा विषय खरा तर आतापर्यंत चावून चोथा झालेला. तरीही आजूबाजूला बघताना आयुष्यातली दोन-तीन दशकं घरातल्या इतरांसाठी खपूनसुद्धा आयुष्यातल्या या टप्प्यावर आपण उपेक्षिल्या जातोय, म्हणून खंतावणाऱ्या अनेक बायका दिसतात. बरोबरच्या मैत्रिणी खूप पुढे निघून गेल्या आहेत. पण आपण मात्र काहीच धड नाही करू शकलो. असं वाटून असुरक्षित वाटून घेणाऱ्या बऱ्याच स्त्रिया अवतीभोवती दिसतात. आयुष्यातल्या जमा-खर्चात बाकी साऱ्या नात्यांची बेरीज करता-करता त्यांनी 'स्वतःबरोबरचं नातं' मात्र वजा केलेलं असतं. . आणि हे आयुष्याच्या ज्या टप्प्यावर जाणवतं, तेव्हा दिनक्रमात जाणूनबुजून बदल करण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता कमी झालेली असते. मग नुसती चिडचिड वाढत जाते. भूतकाळातल्या चुका आणि भविष्यकाळाची चिंता या द्वंद्रामध्ये बळी जातो तो बिचाऱ्या वर्तमानाचा. ते जाणून वागता यायला हवं. पु. शि. रेग्यांच्या सावित्रीच्या शब्दांतच सांगायचं झालं तर, "फार पुढं पाहू नये आणि मागचं रंगवू नये. ' जे झालं आहे ते तसंच दूर ठेवलं पाहिजे. बरोबर वागवण्यानं त्याच्या छटा फिकट होतात. दुसऱ्यांसाठी जगताना स्वतःलाही वेळ देता यायलाच हवा. मुलांच्या निकोप वाढीविषयी आई जितकी जागरूक असते, तितक्याच कसोशीने तिने स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचीही वाढ जोपासायला हवी. मग कुणा देखण्या फ्रेंच हिरोची गरजच लागत नाही 'आत्मभान' जागवायला.

९७ / तरंग अंतरंग