पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लपविलेली एके ४७ अजून सच्चे भारतीय विसरलेले नाहीत. बापूजी तुमच्या नि तुमच्या मुलातला फरक सुनील दत्तनंतरही तसाच चालू आहे, याचा खेद वाटतो. निवडणूक जिंकणं वेगळं नि भारतीयांची मनं जिंकणं वेगळं असतं हे अजून इथं उमगलेलं नाही.
 बापूजी, तुम्हाला आमच्यातून निघून जाण्याला सहा दशके लोटली. आम्ही इथे तुमचे पुतळे, वस्तुसंग्रहालये उभारली, ती नव्या पिढीस तुमचं चरित्र, विचार कळावेत म्हणून. त्यांची दुरवस्था पाहिली की तुमच्या त्यागावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनी काय म्हणावं ते सुचत नाही. बऱ्याचदा वाटत राहतं की तुम्ही अन्य देशांत जन्मता तर ते देश किती बदलले असते. तुमचं प्रासंगिक स्मरण, तेही कर्मकांड म्हणून माझ्यासारख्याला सतत सलत राहतं.
 हे खरं आहे बापूजी, माझी पिढी तुमचा साधेपणा पचवू शकली नाही, पण अजून किती तरी दिवे सच्चेपणाचे काजवे बनून लुकलुकत आहे. त्यांनी पावलापुरता प्रकाश मानून व्यक्तिगत जीवनात त्याग, मूल्यवत्ता, सचोटी पाळली आहे. अजून या देशात अण्णा हजारे, मेधा पाटकर, न्यायालयीन, सामाजिक लढाया हरले तरी लढत आहेत. माझ्यासारखे अनेक शिक्षक पाट्याच टाकतात, पण भरून टाकतात ते बापू तुम्हासच स्मरून! अजूनही पोलीस खात्यात लाच न घेणारा शिपाई दिसतो नि लक्षात येतं अजून कवडसा जिवंत आहे. उद्या नक्कीच पूर्ण सूर्य येईल. मी माझं काम चोख बजावत, जेवढे मला दुसऱ्यासाठी, प्रसंगी पदरमोड करून जे करता येईल ते करत राहतो. अशी शेकडो माणसे बापूजी, या देशात आहेत. मला वाटतं त्यांच्या जीवनावर क्षणिक चित्रपटापेक्षा तुमच्या अमर चारित्र्याचा ठसठशीत प्रभाव आहे म्हणून शेकडो मानव भाई लगे राहतात. 'लगे रहो मुन्नाभाई'चा हेतू साध्य झाला आहे. जगात हेतू शुद्ध असून चालत नाही. शुद्धता नि शुचितेचं सातत्य हे मला कळून आलेलं तुमचं चरित्र! ते इतरांना कळायला काय करावं लागेल?

पत्रोत्तर नक्की द्या. नव्या पिढीस त्याची खरी गरज आहे.


तुमचा,
एक अनुयायी.

***

जाणिवांची आरास/९४