पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

  आज पालकांना आपली मुलं रेसचे घोडे करण्याचा ध्यास लागला आहे. त्यांना टक्क्यांचे टटू हवेत. ‘मूल्यवान माणूस' कुणासच नको आहे. सगळ्यांना हवी आहेत यंत्र... प्रत्येकाच्या कानात एकच मंत्र घुमतो आहे... ‘पळा रे पळा, पाहू कोण पुढे पळतो ते'. आपणास पळणारे नि पाळता येणारे वळू हवे आहेत. स्वतंत्र विचार करणारा माणूस आपली अडचण बनतो आहे, असा माझा अनुभव आहे.
 परीक्षेला पर्याय शोधून कौशल्य, स्मरणशक्तीला फाटा देऊन उपयोजन महत्त्वाचे. भाषेचा उपयोग गाळलेले शब्द भरण्याऐवजी वगळलेली माणसं जोडण्याची कला म्हणून कसा करता येईल याचे आव्हान आपणापुढे ठाकलेले आहे. धोतर व साडीऐवजी पँट वापरणं यालाच जर आपण आधुनिकता म्हणणार असू तर गफलत झाली म्हणून समजा. परीक्षेतून उपयोगिता वाढली पाहिजे. परीक्षेतून कौशल्य विकसित व्हायला हवं. परीक्षेतून मिळवलेल्या टक्क्यांचा उपयोग समाजाची गुणवत्ता वाढविण्यासाठी, गरिबी, विषमता, अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी झाला तर ते योग्य संक्रमण, परिवर्तन होय. पण आज स्थिती उलट आहे. विद्यार्थी सातवी पास झाला की गाव, दहावी पास झाला की तालुका, बारावी पास झाला की जिल्हा, पदवीधर झाला की राज्य नि पदव्युत्तर परीक्षा... विद्यापीठाची परीक्षा पास झाला की देश सोडतो. परीक्षा जोडण्याचे साधन न होता तोडण्याचे हत्यार होते आहे. ही काळजी करण्याची बाब आहे.  परीक्षेनं माझ्यातला 'माणूस' मोठा होतो का, हा खरा प्रश्न आहे. शिक्षणानं येणारं संक्रमण वैभवी तेव्हा असतं जेव्हा माणूस शिकूनही उपयोगी, नम्र भाव, नाते जपणारा राहतो. हिंदी कवी कुँवर बेचैन आपल्या एका कवितेत म्हणतात,
 ‘साडी-टाई बदले, या घर बदले
 प्रश्नचिन्ह नित और बड़ा हो जाता
 कारण केवल यही, दिखावों से जुड़ हम
 तोड़ रहे अनुभूति, भावना से नाता'

 असा माझाही अनुभव आहे. तुमचा?

जाणिवांची आरास/१३८