पान:जपानचा इतिहास.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जपानचा इतिहास.
प्रकरण १ लें.
_______
विषयप्रवेश.

 चीन देशाच्या आग्नेय दिशेला पासिफिक महासागरामध्ये जो द्वीपसमुच्चय अर्धचंद्राकार पसरला आहे, त्यासच जपानचें राज्य असें ह्मणतात. चीनच्या दक्षिणेकडील फोर्मोसा बेटापासून तो पूर्वसैबीरियांतील कामश्चाटका भूप्रदेशापर्यंत जपान व जपानच्या अंगभूत असलेली वेटें या दोहोंची मिळून दोन हजार मैल लांबी आहे. जपानच्या पूर्व दिशेला साडेचार हजार मैल विस्ताराचा पासिफिक महासागर आहे व त्या समुद्राच्यापलीकडे अमेरिका खंड आहे.

 ह्या देशाला पाश्चात्य लोक जंपान अशी संज्ञा देतात.खुद्द जपानी लोक आपल्या देशाला 'निहोन' व केव्हां केव्हां ‘ निप्पोन’ अर्से नांव देतात. परंतु हे दोन्ही शब्द चिनी "जिहपेन' शब्दापासून झाले आहेत. 'जिहपेन' ह्मणजे 'जेथून सूर्य येतो तें स्थान.' जपान देश चीन देशाच्या पूर्वेला असल्यामुळे सूर्योदय त्या देशांतून होतो असें पुरातन काळच्या चिनी लोकांना वाटणे व त्यांनी त्याला तसें अन्वर्थक नांव देणें साहजिक दिसतें. जपानी लोक आपल्या काव्या-मधून वगैरे आपल्या देशाला 'महाभव्य देश' अर्से ह्मणत व अजूनही ह्मणतात, जपानासंबंधानें लिहितांना त्यांच्या ग्रंथांत दाई-निप्पोन, मोठें जपान, अर्से झटलेले वारंवार आढळतें.