पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असा आपला भ्रम होत आहे. यातूनच मनामनांत निराशेचा जन्म होत आहे. या अर्थाने आपण 'भ्रामक' अवस्थेतच आहोत की काय असे वाटते. गदिमांनी अनेक गीतांमधून वर्णन केल्याप्रमाणे जगाच्या पाठीवर 'चित्रविचित्र' असे काहीसे घडत असल्याचे दिसून येते. आजही आपल्या सभोवतालच्या जगात खूप काही चांगले आहे. चांगली माणसे आहेत, चांगल्या संस्था आहेत, चांगले शासकीय नोकर आहेत, चांगले शिक्षक आहेत, चांगले (काही ) नेतेदेखील आहेत. पण आपल्याकडे ते पाहण्याची नजर नाही. डोळसपणा नाही. तेवढा विचार करण्यासाठी वेळ नाही. आपली नजर 'इडियट बॉक्स वरून हटत नाही, वाईट बातम्यांवरून हटत नाही. बाह्य सौंदर्यावरून हटत नाही. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी करताना आपण सजग व्हायला हवे; तारतम्य बाळगायला हवे; जीवनातला आनंद लुटताना आजूबाजूच्या जगाचा विचार व्हायला हवा. जगण्यातले गांभीर्यच हरवून जाऊ नये अशी वर्तणूक हवी; तशी नजर हवी. म्हणून मोहक, आकर्षक पण कुचकामी माणसांच्या घोळक्यातून चांगली व्यक्ती जोखण्यासाठी, सभोवतालच्या अमंगलातील मंगल टिपण्यासाठी, सागररूपी जीवनातील रत्नांचा शोध घेण्यासाठी, सद्गुणांची पारख होण्यासाठी आणि आयुष्याच्या अनेक वळणांवर भेटणाऱ्या व्यक्तींच्या बाह्य सौंदर्याबरोबर आंतरिक सौंदर्य पाहण्यासाठी, त्यांच्या मनाचे - भावभावनांचे सौंदर्य कळण्यासाठी आपली नजर सुंदर हवी. नजर सुंदर हवी । ६३