पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेळी दहा लाडू खायला लावले तर आपल्याला काही दहापट आनंद होणार नाही. उलट एवढे लाडू खायचे कसे या चिंतेने आपण दुःखी होऊ. जबरदस्तीने खाल्लेच तर अपचनाच्या विकाराला सामोरे जावे लागून डॉक्टरकडे धाव घ्यावी लागेल, औषधपाण्याचा आर्थिक फटका बसेल. म्हणजे दु:खांची मालिकाच सुरू होईल. संसाराच्या रगाड्यात दु:खाची निर्मिती व्हायचे एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या मनात नको त्या गोष्टींविषयी निर्माण झालेली आसक्ती. घर, बंगला, गाडी, उंची फर्निचर... यांविषयी मनात ममत्व निर्माण झालेले असते. याबद्दलची एक गोष्ट सांगितली जाते. एका श्रीमंत, कंजुष माणसाची गावात मोठमोठी पाच-सहा घरे होती. त्याची मुले मिळवती होती. प्रत्येकाचा काही ना काही व्यापार-व्यवसाय होता. एकदा तो श्रीमंत मनुष्य परगावी गेला होता. काही दिवसांनंतर परगावाहून परत येऊन पाहतो तर त्याच्या एका मोठ्या घराला आग लागली होती. स्वत:चे घर डोळ्यांसमोर भस्मसात होताना पाहून तो मोठ्याने रडू-ओरडू लागला. एवढ्यात त्याचा एक मुलगा धावत आला आणि म्हणाला, "बाबा, उगाच कशाला रडता आहात? हे घर तर आम्ही कालच विकून टाकले आहे.” मुलाचे हे शब्द कानावर पडताच तो माणूस एकदम रडायचे थांबला आणि हसू लागला. घर जळतेय यासाठी ते रडणे नव्हते तर 'माझे' घर जळतेय यासाठी होते. वस्तूविषयी असलेल्या ममत्व नि आसक्तीमुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनात क्षणाक्षणाला दु:खी होतो आणि सुख हरवून बसतो. आपले सुख हे एखाद्या वस्तूत दडलेले नसून आपल्या मनात लपलेले असते, हे जोपर्यंत माणसाला समजत नाही, तोपर्यंत अंतर्यामी असलेल्या सुखाचा आपल्याला पत्ताच लागत नाही. आपल्यापैकी बरेचजण मनातील सुखाचा शोध न घेता भूतकाळातील दु:खे चघळीत बसतात. भूतकाळात आपल्या हातून घडलेली एखादी चूक, आपला झालेला अपमान, आपण पाहिलेली एखादी दुःखद घटना, मोठे आर्थिक नुकसान किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचे झालेले ५६ । जगण्यात अर्थ आहे..