पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शकतो आणि बऱ्याचदा तो अल्पकाळ टिकणारा असतो. व्यक्तिद्वेष किंवा अन्य गोष्टी त्यात नसतात; याचा विचार कनिष्ठांनी करायला हवा. प्रसंग कोणताही असो. व्यक्ती कुणीही असो. आपला राग ठरावीक पातळी सोडून वर जाता कामा नये एवढी गोष्ट लक्षात ठेवली तर बऱ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात. ज्या व्यक्तींना बारीक-सारीक गोष्टींवरून वारंवार एकदम तीव्र आणि अतितीव्र संताप येतो, ज्या व्यक्ती सतत चिडचीड करत असतात, त्या वैद्यकीय शास्त्राच्या अभ्यासानुसार 'टाईप ए' व्यक्तिमत्त्वामध्ये मोडतात. अशा व्यक्तींना मानसिक ताणाला पुन्हापुन्हा सामोरे जावे लागते. त्यातून तणाव निर्माण होतो. ताण-तणावामुळे या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब, हृदयविकार, दमा आणि इतर अनेक मनोकायिक विकारांचे प्रमाण, शांत स्वभावाच्या म्हणजे 'टाईप बी' प्रकारच्या व्यक्तींपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. आपल्याला जर वारंवार राग येत असेल, तर आपल्याला कोणत्या गोष्टींचा, कोणत्या प्रसंगांचा राग येतो याचा नीट विचार करावा. अशा प्रसंगी इतरांच्या जागी आपण असतो तर काय झाले असते याचा शांतपणे आणि गांभीर्याने विचार करावा. रागवायचेच असेल इतरांच्या चुकांवर रागवू नये. फक्त स्वत:च्याच चुकांवर रागवावे. मन शांत ठेवावे. मनाचा समतोल बिघडवू देऊ नये. अर्थात 'मन क्रोधित आणि बाहेरून चेहऱ्यावर मात्र शांतता' ही अवस्था आजारी अवस्था असते. तिचे परिणाम तर खूपच वाईट असतात. म्हणून मनाला रागच येऊ देऊ नये. जो माणूस छोट्या-छोट्या गोष्टींमुळे संतापत नाही; रागावत नाही; मन ताब्यात - शांत ठेवतो, तोच माणूस मोठ्या आपत्तीलादेखील तोंड देऊ शकतो. कारण मन शांत ठेवण्याची, कोणत्याही गोष्टीचा शांतपणे विचार करण्याची सवयच त्याला लागलेली असते. म्हणून अशा क्षणी विचार करावा; अविचार करू नये. विचार हा माणसाला प्रगतिपथावर नेतो. पण रागामुळे विचारांचे रूपांतर अविचारात होते आणि व्यक्ती अधोगतीकडे जाते. समर्थांनी म्हटले आहे, राग नावाचा रोग । ५१