पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हा जीवसृष्टीचा नियम आहे. या निसर्गनियमानुसार वयात आलेल्या मुला-मुलींना एकमेकांचे वाटणारे आकर्षण हे लैंगिक आकर्षण असते. प्रेम ही एक शुद्ध, नैसर्गिक भावना आहे. खरे प्रेम हे गरजेवर अवलंबून नसते. ते ब असते. असावे लागते. गरज संपल्यानंतरही एकमेकांच्या जीवनाची कदर तेथे असावी लागते. खऱ्या प्रेमासाठी स्वार्थत्याग, तडजोड, सहकार्य यांची गरज असते. प्रेम हे सावकाश निर्माण व्हावे लागते. म्हणून मुला-मुलींनी पौगंडावस्थेतील नैसर्गिक आकर्षणाला भुलून न जाता, जागरूक राहून आपल्या भावी आयुष्याकडे झेपावण्यासाठी जे काही कार्य, शैक्षणिक दिशा स्वीकारली असेल त्यालाच वाहून घ्यावे. या वयात लैंगिकतेचे वास्तव जाणून घेण्यासाठी कधीही स्त्री- पुरुषांच्या खाजगी संबंधांबद्दल कोणाकडूनही अज्ञानीपणाने, अशास्त्रीयपणे, बेजाबाबदारपणे सांगितले किंवा लिहिले गेलेले असल्यास त्यावर अंधविश्वास टाकू नये. स्त्री-पुरुषातील शारीरिक संबंधांबद्दल जे 'संदर्भ' म्हणून नमूद करून लिहिलेले असते ते बऱ्याचदा वास्तवाला धरून नसते. त्यामुळे अशा बाबींची शहानिशा न करता त्या आंधळेपणाने स्वीकारू नयेत. या वयात लैंगिकतेविषयी माहिती कशी मिळणार? ही माहिती मिळण्यासाठी पालकांच्या मदतीने शास्त्रीय माहिती देणाऱ्या, तज्ज्ञ डॉक्टरांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वाचन आणि त्यांतून ज्ञानप्राप्ती करावी. याला पर्याय नाही. शालेय जीवनात शास्त्र हा विषय शिकताना मुलांना आपण ज्याप्रमाणे श्वसनसंस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था यांची माहिती करून देतो, त्याचप्रमाणे सजीवांचे अस्तित्व टिकून राहावे यासाठी निसर्गाने निर्माण केलेल्या प्रजनन संस्थेविषयी माहिती करून द्यायला हवी. यामध्ये प्रजननसंस्थेतील इंद्रिये, जननेंद्रिये, त्यांची रचना आणि कार्ये यांची माहिती सर्वांना होणे ही लैंगिक शिक्षणातील प्राथमिक गरज आहे. तारुण्यात पदार्पण केलेल्या अनेक व्यक्ती लैंगिकतेविषयी शास्त्रीय माहिती नसल्याने आणि नको त्या माध्यमांतून अवैज्ञानिक, अवास्तव माहिती मिळाल्यामुळे चुकीच्या मार्गाला लागतात. ३० । जगण्यात अर्थ आहे..