पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आधीपासून समाजसेवेची आवड असेल तर उत्तमच ! नसेल तर ती आवड निर्माण करावी. सर्वसामान्यांना नेत्रदान, रक्तदान, देहदान यांची माहिती द्यावी. त्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे. एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांशी गप्पा माराव्यात. बऱ्याच रुग्णांजवळ सतत बसण्यासाठी नातेवाईक नसतात. त्यांच्याशी गुजगोष्टी कराव्यात. हॉस्पिटलमध्ये जाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे अनेक व्याधींनी त्रस्त असे विविध रुग्ण पाहिले की आपण किती सुखी आहोत याची जाणीव होते. चार-पाच किंवा आठ-दहा बुजुर्गांनी एकत्र येऊन विनामूल्य किंवा माफक फी घेऊन संस्कारवर्ग चालवावेत आणि आदर्श नवी पिढी तयार करण्याचा प्रयत्न करावा. अर्थात यात कोणत्याही प्रकारचा अट्टाहास किंवा फळाची अपेक्षा ठेवू नये. हे सर्व करत असताना घरात किंवा घराबाहेर सर्वांना हवेहवेसे वाटेल असे आपले बोलणे, वागणे ठेवावे. कोणालाही उपदेश करण्याची अनावर इच्छा झाली तरी मनावर ताबा ठेवून 'कोणी मागितला तरच ' सल्ला द्यावा. हे सर्व आनंदाने नि हसतमुखाने करावे. वृद्धापकाळात आपली भूतकाळातील अथवा वर्तमानकाळातील दु:खे चघळत बसण्यापेक्षा स्वतःमध्ये सकारात्मक बदल करून इतरांमध्ये आनंददायी ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास आयुष्याला अर्थ प्राप्त होईल आणि मृत्यू कधीही आला तरी गडकऱ्यांचे 'जोपर्यंत जगण्यात अर्थ आहे तोपर्यंत मरण्यात मौज आहे' हे विधान सत्यात उतरेल. वृद्धांसाठी सन्मानपूर्वक... । १४५