पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बिघडते. ईस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनच्या कमतरतेमुळे जीन्सच्या कार्यक्षमतेत बदल होत जातो आणि अप्रत्यक्षरीत्या पेशींमध्ये बिघाड निर्माण होतो. पेशींचे नाश होण्याचे प्रमाण वाढते; प्रथिने तयार होत नाहीत; रक्तवाहिन्यांमध्ये काठिण्य येते; हाडांमध्ये ठिसूळपणा येतो. गंमत म्हणजे, वृद्धावस्थासुद्धा आनुवंशिक असते. म्हणजे दीर्घायुषी मातापित्यांची संतती अपघात किंवा इतर आजाराने मृत्यू न आल्यास दीर्घायुषी बनते. पण उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, मूत्रपिंडविकार, मेंदुविकार, सांधेदुखी आणि असह्य मानसिक ताणतणाव या किंवा अशा अनेक कारणांमुळे अनेकांना हे दीर्घायुष्य नकोसे होऊन जाते. या दीर्घायुष्यातील वृद्धापकाळ सुखाचा होण्यासाठी वृद्धांनी काही पथ्ये पाळावीत असे आदराने सांगावेसे वाटते. जेव्हा आपण निवृत्त होतो तेव्हा ऑफिसच्या कामाचा संबंध संपतो. ऑफिसमध्ये अधिकारावर असताना आदेश, निर्णय देता येतात. हा अधिकार निवृत्तीनंतर संपतो. ऑफिसमधील एखाद्या व्यक्तीने जर सल्ला विचारला तरच तो आपण देतो. याच पद्धतीने संसारातूनही आपण निवृत्त व्हावे. वय वाढलेल्या मुलांना निर्णय घेऊ द्यावेत. आपण आदेश देत बसू नये. वृद्ध स्त्रियांनीही स्वयंपाकघरातून निवृत्त व्हावे. सून स्वयंपाकघरात काटकसर करते का, अन्नाची नासधूस करते का... अशा गोष्टीत लक्ष घालू नये. वृद्धांकडे वेळच वेळ असतो. त्या वेळेचा सदुपयोग करावा. घरातील कमी श्रमाची कामे करावीत, जेणे करून वेळ छान जाईल. नातवंडांना शाळेत पोहोचविणे, त्यांना अभ्यासात मदत करणे, झाडांना पाणी घालणे, बिले भागविणे, बाजाराची खरेदी करणे, भाजी निवडणे, स्वयंपाकास मदत करणे... अशा अनेक कामांमुळे घरातल्यांना आपली गरज भासू लागेल. याशिवाय चिंतन-वाचनासारख्या छंदातून आनंद मिळवता येईल. देण्यासारख्या बऱ्याच गोष्टी वृद्धांकडे असतात. महत्त्वाचा म्हणजे त्यांच्याकडील अनुभव. त्यांनी काम केलेल्या क्षेत्रांतील बारकावे, खाचखळगे त्यांनी इतरांना सांगावेत, लक्षात आणून द्यावेत. इतरांना सावध करावे; शहाणे करून सोडावे. १४४ | जगण्यात अर्थ आहे..