पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हृदयविकाराचा हात असू शकतो. यामुळे अशा तक्रारींकडे डोळेझाक करण्यामुळे जिवावर बेतू शकते. मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या एका उच्चशिक्षित व्यक्तीला रात्रीच्या जेवणानंतर मळमळू लागले. जेवण आणि जेवणापूर्वीचे रसपान हॉटेलमध्ये झाल्यामुळे झाला प्रकार पित्त समजून नेहमीच्या पित्ताच्या गोळ्या त्यानी घशाखाली सरकविल्या. पित्त कमी होण्याची वाट पाहिली पण छातीतील जळजळणे थांबायला तयार नव्हते. पित्तावरील आणखी एक पातळ औषध त्यांच्या सौं.नी त्यांना घ्यायला लावले. तरीही फरक पडला नाही... औषधांबरोबरच 'बाहेर वारंवार खा जाऊ नका, पीत जाऊ नका, पाट्र्यांचं प्रमाण कमी करा, धावपळ - जागरणं नकोत... पण आमचं ऐकतं कोण?' असा गाऱ्हाणेवजा डोसही पाजविला. त्यावर 'उलटी झाली की बरे वाटेल' हा नेहमीचा हमखास यशाचा फार्म्युला अखेर श्रीयुतांनी स्वीकारला आणि उलटी काढण्यासाठी ते बेसीनजवळ गेले. एव्हाना घड्याळातील काट्यांनी बारा वाजवले होते. नेहमीच्या पित्तविकारामुळे डॉक्टरांना बोलवावे, फोन करावा किंवा हॉस्पिटलमध्ये जावे असा पुसटसा विचारही त्या दांपत्याच्या मनात आला नाही. भरपूर उलटी काढली गेली, छातीत जळजळणे थांबले नाहीच. पित्ताचा त्रास कमी व्हावा म्हणून घरभर येरझाया घालणारे हे गृहस्थ ज्यावेळी अचानक खाली कोसळले, त्यावेळी त्या त्रासाची तीव्रता आणि गांभीर्य सौं. च्या लक्षात आले. तो हृदयविकाराचा झटका होता. फॅमिली डॉक्टर आले, पण वेळ तोपर्यंत निघून गेलेली होती. उच्च रक्तदाब, स्थूलपणा, व्यायामाचा अभाव हे हृदयविकाराला साथ देणारे घटकही या प्रसंगाला कारणीभूत होते. काही वेळा पोटात असह्य अशा वेदना होतात. मूतखडा, पित्ताशयाला येणारी सूज, पित्ताशयातील खडे, स्वादुपिंडाचा दाह, अपेंडिक्सचा दाह किंवा आतड्याचे विकार तसेच स्त्रियांतील मासिक पाळी अथवा गर्भाशयाचे विकार इत्यादींमुळे अशा तक्रारी उद्भवतात. औषधोपचारांशिवाय या तक्रारींचे निवारण होत नसल्यामुळे असे रुग्ण डॉक्टरांकडे जातात. पण कशासाठी? पोटासाठी! । १३९