पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्या बुहधा 'टाईप ए' व्यक्तिमत्त्वाच्या असतात. सतत घाई करणे, कसल्या ना कसल्या चिंतेत असणे, स्वभाव संशयी असणे, सतत चिडचीड करणे, कामाचे नियोजन न करता गोंधळ निर्माण करणे, स्वत:विषयी फाजील आत्मविश्वास असणे, स्वतःविषयी वारंवार बोलणे, स्वत:ला श्रेष्ठ समजणे, इतरांचे लक्ष वेधण्यासाठी काही करू पाहणे... अशी 'टाईप ए' व्यक्तिमत्त्वाची काही ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. 'हरी, वरी, करी, जो न करी । तयाला पित्तविकार बेजार न करी ॥ या आधुनिक उक्तीतील हरी, वरी आणि करी हे मातृभाषेतील नसून इंग्रजीतील आहेत. हरी (Hurry) म्हणजे घाई, वरी (Worry) म्हणजे चिंता आणि करी (Curry) म्हणजे आमटी. जी व्यक्ती घाई करत नाही, चिंता करत नाही आणि अती तिखट, अती गरम किंवा अती थंड पदार्थ खात नाही, तिचे पित्त वैद्यकीयदृष्ट्या कधीही खवळत नाही. जे वारंवार चहापान, कॉफीपान करीत असतात ते पित्ताच्या तावडीतून सुटत नाहीत. तंबाखू, चुना, सुपारी, मावा, गुटखा, तपकीर, मिशेरी हे सारे पित्ताला हातभार लावणारे भाईबंद असल्याने त्यांना चार हात दूर ठेवणे बरे. ज्या व्यक्ती वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात, अशा व्यक्तींच्या जेवणाच्या वेळाही नियमितपणे 'अनियमित' होत असतात. परिणामी त्यांच्या वाट्याला पित्तविकार येतो. व्यापारानिमित्त भटकंती करणाऱ्या व्यक्ती बऱ्याचदा आपली बॅग भरताना त्यात पित्तविकारावरील गोळ्यांचे पाकीट घेताना दिसतात. एसटी स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर भजी - वड्यांसारखे पदार्थ किंवा आकर्षक पाकिटातील खाद्यपदार्थ आपले लक्ष खेचून घेतात. आपण त्यांच्या आहारी जातो. म्हणजे ते आपल्या 'आहारी' येतात आणि पित्तविकार वाढवतात. त्यामुळे प्रवासात जिभेवर ताबा ठेवणे अधिक योग्य. पित्तावरील गोळ्या वाटेल तिथे, वाटेल तेव्हा आणि वाटेल तितक्या वेळा घेणाऱ्या व्यक्तींना काही वेळा चकवा मिळतो. कारण पोटात मळमळणे, उलटी आल्यासारखे वाटणे, छातीत जळजळणे, उलटी होणे या तक्रारींमागे कदाचित १३८ । जगण्यात अर्थ आहे..