पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराजांनी त्याला थांबण्याची खूण केली. काही वेळाने पिंटकराम म्हणाला, “महाराज त्या झाडाला धरून काय बसलात? मला उपाय सांगा. " महाराज म्हणाले, “अरे, पण मी तिकडे कसा येऊ? या झाडाने मला धरून ठेवलंय." पिंटकराम चिडून म्हणाला, "अहो, काय वेड्यासारखे बडबडता? झाडाने तुम्हाला धरले नाही; तुम्हीच झाडाला धरले आहे. तुम्ही हात सोडा म्हणजे झाड तुम्हाला सोडेल.” महाराज हसले आणि म्हणाले, "अरे, तू हे सांगतोस? हाच विचार कर. ज्याप्रमाणे झाडाने मला धरले नाही; त्याप्रमाणे दारूने तुला धरले नाही. तूच तिला धरले आहेस. तिला सोड. सुटेल. आपल्यापैकी अनेकांची अवस्था पिंटकरामपेक्षा वेगळी नाही. अर्थात निर्धाराबरोबर डॉक्टरांचा सल्ला आणि काही प्रमाणात औषधोपचार घेतल्यास दारू किंवा अनेक व्यसने सुटतात. ग्रामीण भागात शेतकरी आपला बैल उधळू नये, मोकाट सुटू नये म्हणून त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बैलाच्या नाकातून दोरी ओवतात; तिला 'वेसण' म्हणतात. वेसण हातात असेल तर बैल उधळत नाही; मोकाट सुटत नाही. आयुष्याची गाडी उधळून टाकायची नसेल; संसाराला मोकाट होऊ द्यायचे नसेल तर व्यसनरूपी वळू जीवनाला जुंपू नका. हृदयविकार - यकृताचे विकार- कर्करोग यांसारखे दुर्धर विकार टाळण्यासाठी, अपघाती घटनांपासून सुरक्षित राहण्यासाठी, मानसिक दुर्बलता येऊ न देण्यासाठी, आत्मविश्वास दृढ होण्यासाठी, आयुष्यातील चढउताराला धैर्याने सामोरे जाण्यासाठी, संसारात स्वाभिमानाने, ताठ मानेने जगण्यासाठी, स्वतःचा व कुटुंबातील इतरांचा आनंद चिरकाल टिकण्यासाठी - टिकविण्यासाठी आणि दीर्घायु होऊन जीवन सुंदर आणि संपन्न होण्यासाठी, व्यसनाला वेळीच 'वेसण घाला. १९९८ । जगण्यात अर्थ आहे..