पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्थात त्यासाठी पालकांच्या अंगी चांगूलपणा हवा. मोगऱ्याची सात-आठ फुले एखाद्या रुमालाच्या घडीत ठेवून काही दिवसांनी ती घडी उघडून पाहिली तर फुले सुकून गेलेली आढळतील. ती झटकून टाकून दिली तरी त्यांचा सुगंध रुमालाच्या घडीला बिलगलेला असतो. तो दिसत नाही, पण येतो आणि आनंद देतो. मन प्रसन्न करून टाकतो. मोगरीच्या फुलातील सुगंधाचा संस्कार रुमालाच्या घडीने टिपलेला असतो. संस्काराची ही खरीखुरी प्रक्रिया आहे. मोगरीची फुले आणि रुमालाची घडी यांच्या साहचर्यातून सुगंधाचा संस्कार उरलेला असतो. पालकांची भूमिका मोगरीच्या फुलासारखी हवी. घरात किंवा घराबाहेर घडलेल्या एखाद्या गोष्टीचा राग पालकांना आलेला असतो आणि नेमक्या अशा क्षणी समोर आलेल्या आपल्या मुलाला हे पालक ताडकन लगावून देतात. हे पूर्णत: चूक आहे. राग आला असेल तर त्या रागाला मारावे. मुलाला नव्हे. आपले वडील हेसुद्धा आपल्यासारखे खेळकर आहेत, त्यांना गंमत केलेली आवडते असे मुलांना वाटले पाहिजे. लहान मुलांबरोबर लहान व्हावे, हसावे, खेळावे, वाकुल्या दाखवाव्यात. मुलांना धाकदपटशा दाखवू नये. आपले मूल निर्भय, मनमिळावू आणि हुशार व्हावे असे वाटत असेल तर हे निर्मळ मन आपण आपल्या वागणुकीतून, सहवासातून मुलांना दिले पाहिजे. 'मी माझ्या मनातील कोणतीही खळबळ पालकांपुढे व्यक्त करू शकतो. ते मला रागे न भरता, शिक्षा न करता समजून घेतील आणि अचूक मार्गदर्शन करू शकतील.' असा भरवसा मुलांना वाटला पाहिजे. आपण आपल्या मुलांशी जर मोकळेपणाने आणि आदराने बोलाल तर आपल्या घराइतके सुखी घर शोधूनसुद्धा सापडणार नाही. महाकवी खलील जिब्रानच्या भाषेत सांगायचे तर... तुमची मुलं ही तुमची नव्हेत ती जीवन जगण्याची धडपड आहेत जीवनाच्या उत्कट आकांक्षेची मुलं आहेत १०६ । जगण्यात अर्थ आहे..