पान:चित्रा नि चारू.djvu/६२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 "तिचे नाव चित्रा. तिनेच ते रामायण मला दिले. प्रेमाची भेट. मला रामायण फार आवडते. एकपत्नी, एकवचनी राम आणि सीतादेवी तर केवळ सत्त्वमूर्ती ! "

 "कोठे आहे तुझी चित्रा ? "

 "माझ्या हृदयात आहे."

 “तू पत्र नाही पाठवीत तिला ? "

 "आमचे बायकांचे नाही हो शेवटी जमत. नव-यांच्या संसारात आम्ही एकरूप होतो."

 "फातमा, आज पट्टी नाही दिलीस. "

 "माझ्या चित्राला मी पट्टी करून देत असे. तिला माझ्या हातची आवडे. तिचे तोंड रंगे. माझे तोंड रंगत नसे तेव्हा."

 "आता रंगते ना ? "

 "दिलावरने मला विडा दिला म्हणजे रंगते. ही घे पट्टी. दिलावर, मला एक वचन दे आज."

 "काय वचन देऊ ?"

 "नकोच पण वचन. तू चांगलाच वागशील."

 दिलावर बाहेर निघून गेला.

 इकडे एके दिवशी चित्रा रडत होती, तो ती मोलकरीण आली.

 "काय ग तुझे नाव ? "

 "माझे नाव अमीना."

 "अमीना, तू स्त्री, मी स्त्री. स्त्रीची स्त्रीने नाही बाजू घ्यायची तर कोण घेईल ? तू येथून मला सोडव. मी तुझे उपकार फेडीन, तुझे दारिद्र्य फेडीन. माझ्यावर विश्वास ठेव. अमीना, माझा पती माझ्यासाठी तडफडत असेल, पाखरेसुद्धा नर-मादी जर अलग झाली तर तडफडून प्राण देतात. आपण तर माणसे. अमीना, वाचवशील मला ?"

 "मी एक करू शकेन."

 "काय ? "

 धन्याची बायको म्हणजे देवमाणूस आहे. तिच्या कानांवर मी तुमची हकीगत घालीन. तिला तुमची दया येईल.”

६४ * चित्रा नि चारू