पान:चित्रा नि चारू.djvu/५२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 "शिपाई. त्या गावांचे पाटील बाहेर आले आहेत, त्या सर्वांना बोलवा आत.' साहेबांचा हुकूम झाला.

 ते पाटील आत येऊन उभे राहिले.

 "हे तुमच्या गावांना गेल्या आठपंधरा दिवसांत आले होते का ?"

 " नाही आले. आम्ही बोलावले होते. लोक आणेवारीची तक्रार करीत आहेत."

 " काय हो, हे पाटील काय म्हणतात ?"

 "मला काही कळत नाही."

 "ठीक, तुम्हाला कळेल असे करतो हां, जा."

 बळवंतराव खरेच निघून गेले. ते बाहेर जाऊन बसले. थोड्या वेळाने घरीच निघून गेले. कलेक्टरने कडक रिपोर्ट वर केला. बळवंतरावांना नालायक ठरवण्यात आले. परंतु सरकारने, त्यांनी सक्तीची काही महिने रजा घ्यावी असे सांगितले. जर पुढे कार्यक्षम दिसले तर पुन्हा कामावर घेण्यात येईल असे कळविले.

 बळवंतरावांना हा मोठाच धक्का होता. सार्वजनिक जीवनाच्या दृष्टीने ही बेअब्रू होती. तिकडे मुलीचा पत्ता नाही. इकडे नोकरीवरून बडतर्फ. पुन्हा कामाला नालायक हा शिक्का ! सरकारदरबारी बेअब्रू. बळवंतराव खोलीत सचित होऊन बसले. काय करावे ते त्यांना सुचेना.

 " भोजू , " त्यांनी हाक मारली.

 " काय साहेब ? "

 "चित्रा आली का ? "

 "नाही साहेब. कोठून येणार ? "

 "तू म्हणाला होतास ना, की येईल म्हणून ?"

 "अजूनसुद्धा म्हणतो. धनी, घोर नका करू. सारे चांगले होईल. देव सत्त्व पाहातो आहे."

 "भोजू , चित्रा सापडली तरच आता बरे दिवस येतील. माझे भाग्य चित्राशी जणू जोडलेले आहे. ती जन्मली व आम्हाला ऊजितकाळ आला. मुले वाचू लागली. कोठे आहे चित्रा? कधी भेटेल? आज नोकरी गेली. बेकार झालो. उद्या काय होणार ? कोठे आता थांबणार संकटांची

५४ * चित्रा नि चारू