पान:चित्रा नि चारू.djvu/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हो तुम्ही मला होऊ देत नाही. म्हणून तुम्हाला हल्ली मी आईच म्हणते. त्यांची आई ती माझीही आईच, येईन मी. देवीच्या पाया पडू."

 चित्राने चारूला ते सारे बोलणे सांगितले.

 "चित्रा, तुझा का अशा नवसांवर विश्वास आहे ?"

 "चारू,जगात चमत्कार नाहीत असे नाही. तुझे-माझे लग्न हाही एक चमत्कारच नाही का? कोठले दोन जीव आणि कसे एकत्र आले! आपण जर जरा खोल पाहू तर सर्वत्र चमत्कारच दिसतील, चारू, मी लवकर परत येईन. सासूबाई राहातील. तू येशील ना मला न्यायला ?"

 "पत्र पाठव म्हणजे येईन. चित्रा, मला का नाही घेऊन जात ? "

 "चारू, तू विचार ना सासूबाईंस."

 "परंतु मला तिकडे यायला आवडत नाही."

 "मला ते ठाऊक आहे. ती मुलगी तिकडे आहे. म्हणून ना ? "

 "तुला कोणी सांगितले ?"

 "साऱ्या जगाला माहीत आहे."

 एके दिवशी सासूबाईंच्या माहेरचे कोणीतरी त्यांना न्यायला आले होते. सासूबाई निघाल्या. चित्राचीही तयारी झाली.

 "चित्रा, लौकर ये हो."

 "चारू प्रकृतीस जप."

 "माझ्या प्रकृतीची काळजी तू घ्यायचीस, तुझ्या मी. खरे ना ?"

 "होय हो. मी लवकरच येईन."

 "आई, चित्राला लवकर परत पाठव हो."

 "चारू, असे काय वेड्यासारखे करतोस ? येईल ती. राहील आठ दिवस. कुठे परमुलखात नाही जात. तू तर आजोळी येतच नाहीस."

 "योग्य वेळी येईन."

 सासूबाई व चित्रा गेली. चारू आता घरी होता. चित्राच्या आठवणी काढीत बसे. मळ्यात जाऊन बसे.

 सासूबाईंचे माहेर मोठे होते. कितीतरी माणसे. कोणाचा कोणाला पत्ता नसे. त्या गावात मुसलमानांचीही बरीच वस्ती होती. सासूबाईंच्या माहेरी मुसलमान येत जात. कामकाज असे, व्यवहार असे.

.

४२ * चित्रा नि चारू