पान:चित्रा नि चारू.djvu/२०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 "काय काय तरी आहे. अजून सारे नीट लक्ष देऊन थोडेच पाहिले आहे ! जेवल्यावर पाहीत." ती म्हणाली.

 मजेने हसत खेळत बोलणी चालली, तो पाणी पिताना चित्राला ठसका लागला. अळसूद गेले. ती घाबरली. " वर बघ, वर बघ. सासू टांगलेली आहे." बाप हसून म्हणाला.

 "सासूच सुनेला टांगीत असेल. " चारू हसून म्हणाला.

 " नव्या युगात आता सुनाच सास्वांना टांगतील." जहागीरदार म्हणाले.

 " किती ठसका लागला. फातमाने आठवण काढली असेल. तिचे लग्न लागले असेल." चित्रा म्हणाली.

 जेवणे झाली. बंगलीतील बैठकीवर सारी बसली. पानसुपारीचे तबक होते. सर्वांनी विडे खाल्ले. परंतु चित्राने पान घेतले नाही.

 "तुम्हाला नको का ?" चारूने विचारले.

 " मला नाही आवडत विड़ा करायला. चुन्यात बोट घालायचे. " चित्रा म्हणाली.

 "परंतु खायला आवडतो ना? " पित्याने विचारले.

 "कोणी करून दिला तर मी खाते. फातमाला पान फार आवडे. तिच्या आजोबांच्या तोंडात तर नेहमी पान असायचे. फातमा मला पट्टी करून देत असे. माझे छान रंगे तोंड. फातमाचे नसे रंगत. मग मी काय म्हणायची बाबा, आहे का माहीत ?"

 "काय ग म्हणस ? "

 "फातमा तुझ्यावर कोणाचे प्रेम नाहीं, तुझा विडा रंगत नाही. माझ्यावर सर्वांचे प्रेम आहे. माझा विडा रंगतो. आणि फातमा म्हणे, तुझेही नाही का माझ्यावर प्रेम ? मग मी हसत असे व म्हणे, तुला कळत नाही, काही समजत नाही. फातमा मग मला चिमटा घेई. जणू सारे समजले असे दाखवी."

 इतक्यात चारूने सुरेख विडा तेथे हळूच करून ठेवला. तो उठून गेला. चित्राने तो हळूच उचलून खाल्ला.

 " पडा जरा.” जहागीरदार बळवंतरावांस म्हणाले,

२२ * चित्रा नि चारू