पान:चित्रा नि चारू.djvu/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "काय बाबा ? "

 "बस की यांच्याबरोबर. खा फळे. या आतच आल्या. बस."

 "बाबा, मला नकोत. " चारू म्हणाला.

 "अरे असा लाजतोस काय ? आमचा चारू साऱ्या मुलखाचा लाजरा आहे."

 "परंतु आमची चित्रा साऱ्या मुलखाची धीट. वाटेल त्याच्याजवळ बोलेल. मैत्री करील. ते फौजदार होते ना महंमदसाहेब, त्यांच्याकडेही चित्री जायची. त्यांची मुलगी फातमा ती हिची मैत्रीण."

 "मुसलमानाशी नको हो मैत्री !” चारू म्हणाला.

 "मुसलमान का सारेच वाईट असतात? " चित्राने विचारले.

 "इतर देशांतील चांगले असतील, या देशातील तरी वाईट आहेत." जहागीरदार म्हणाले.

 " या देशातील मुसलमान हिंदूतून बाटून झालेले ना ? जर ते वाईट असतील तर मुळात हिंदुच वाईट असे नाही का ?" चित्राने विचारले.

 " वा, चांगलाच वाद करते तुमची चित्रा," जहागीरदार म्हणाले.

 " फार चुरुचुरू बोलते ती. बॅरिस्टर हवा नवरा तिला. इतर नवरे नाही उपयोगी." बळवंतराव हसून म्हणाले.

 " आमचा चारू अगदीच मुखस्तंभ ! " जहागीरदार जर ओशाळून म्हणाले.

 " अहो, मुखस्तंभ नाहीत काही ते. मघा तिकडे माझ्याजवळ किती तरी वेळ ते बोलत होते. माझे नाव-गाव विचारीत होते. खरे की नाही हो ? " चित्रेने हसून विचारले.

 "परंतु आधी तुम्हीच विचारले, " चारू हसून म्हणाला.

 "इतक्यात गड्याने येऊन स्वयंपाक तयार आहे असे सांगितले. बोलणे चालले असता फळांचा फन्ना केव्हाच उडवण्यात आला होता.

 "चित्रा, बसायचे को जेवायला ? बसूच, लौकर परत जाऊ, "

 " लौकर को बाबा ? संध्याकाळ झाली म्हणजे निघू. उन्हातून कशाला ? "

२० * चित्रा नि चारू