पान:चित्रा नि चारू.djvu/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "तुमची आई तुमच्या लग्नाची खटपट करीत नाही का ? मला माहीत आहे."

 "परंतु तुमचे नाव काय ?"

 "सांगूच ? "

 "सांगा."

 "हस्त नक्षत्राच्या पुढे कोणते नक्षत्र येते ? "

 "माझी परीक्षा घेता वाटते ? "

 "हो."

 "उत्तरा ना?"

 "अहो, हस्त नक्षत्राच्या पाठीमागचे नाही ! हिन्दुस्थानला पाठीमागे नाही जायचे, पुढे जायचे आहे !"

 " उत्तरा, हस्त, चित्रा,...."

 "तुमचे नाव चित्रा ? "

 "होय."

 " छान आहे नाव. रवींद्रनाथांच्या एका काव्यमय नाटकाचे नाव चित्रा आहे."

 " तुम्ही आता जा तिकडे. माझा गुच्छ नाही तर तसाच राहील."

 चारू निघून गेला. चित्रेने त्याच्याकडे पाहिले. तिने सुंदर गुच्छ तयार केला आणि ती बंगलीत परत आली.

 "चित्रा, कोठे होतीस हिंडत ? " बळवंतरावांनी विचारले.

 " होत्ये फुलांच्या संगतीत." ती म्हणाली.

 "गालांची फुले झाली आहेत. उन्हात इतक्या वेळ का राहायचे ? "

 "बाबा, लागू दे की एखादे वेळेस थोडे ऊन ! "

 "तुला भूक लागली आहे का ? ही बघ फळे आहेत. आम्ही खाल्ली. तुला ठेवली आहेत."

 "मी का आता एकटीच खाऊ ? "

 " आमचा चारू पण खाईल, त्यानेच चिरून आणली. परंतु खाल्ली नसतील. चारू, अरे चारू...." जहागीरदारांनी हाक मारली.

१४ * चित्रा नि चारू