पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टाकायला सुरुवात केली. मार्क्सवादापासून दूर जाणाऱ्या स्त्रीकार्यकर्त्यांचीही अशीच अवस्था झालेली आहे.
 सर्व विश्व ही एक व्यवस्था आहे व ती अनेक उपव्यवस्थांची बनलेली आहे. अशी सम्यकवादी (Holistic) विचारसरणी आता त्यांना मान्य होते पण हीच विश्लेषणपद्धती सामाजिक प्रश्नांनाही लावली म्हणजे वर्गविश्लेषण मोडून पडते एवढेच नव्हे तर स्त्री विरुद्ध पुरुष अशा प्रकारच्या विश्लेषणालाही आधार राहात नाही हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही. नीतिमत्ता किंवा मूल्य ही व्यवस्थेची कारणे नसून परिणाम असतात याचाही त्यांना विसर पडतो. आणि एका काळी मार्क्सवादाच्या वैचारिक शिस्तीची जाण असलेली ही मंडळी उपभोग मर्यादित झाले पाहिजेत, नैतिक परिमाणे नसतील तर तंत्रज्ञान नकोच असे मांडतात. एवढेच नव्हे तर हक्क, स्वातंत्र्य, समता या कल्पनांनाही विरोध करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. पर्यावरण व त्याचे प्रदूषण यासंबंधी आज मोठी जागृती होत आहे. या चळवळीशी महिला आंदोलनाचा बादरायणी संबंध जोडण्याचा प्रयत्न होतो आहे. औद्योगिकीकरणातून तयार होणारी प्रदूषणसमस्या ही भांडवलनिर्मितीच्या विपरीत प्रक्रियेशी संबंधित आहे हे न जाणता पुरुषप्रधान नियोजनव्यवस्थेवर त्याचा दोषारोप टाकणे हे याच प्रवृत्तीचे उदाहरण आहे.
 चांदवडनंतर घडलेली आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे समग्र महिला आघाडीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवण्यासाठी केलेली तयारी व त्यानंतर या विषयावर घडून आलेले मोठे बदल. विकासाची दिशा ग्रामीण स्त्रीच्या दृष्टिकोनातून ठरली पाहिजे असे चांदवड अधिवेशनात आग्रहाने मांडण्यात आले आहे.
 ग्रामीण स्त्रियांच्या दृष्टिकोनातून विकासाच्या प्रक्रियेत काय फरक पडले याची व्यावहारिक उदाहरणे समग्र महिला आघाडीच्या जाहीरनाम्यात दिली होती. या विकासाच्या दृष्टिकोनास आणि पंचायती राज्य व्यवस्थेत स्त्रियांचा मोठा सहभाग असावा या कल्पनेस सर्वमान्यता मिळालेली आहे.
 कार्यक्रमाचे स्वरूप

 अगदी सुरुवातीच्या समाजसुधारकांनी स्त्रीशिक्षणावर भर दिला होता. स्त्री-शिक्षणाने गेल्या काही वर्षांत मोठी प्रगती केली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मॅट्रिक झालेल्या कोणासही रेशन खात्यात, इतरत्र नोकरी मिळू शकते असे दिसल्यावर सर्व रूढी आणि परंपरा मोडून अगदी भद्र लोकांच्या घरातील लेकीसुनासुद्धा शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ८६