पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घराबाहेर पडल्या. अजून निरक्षरांमध्ये स्त्रियांचेच प्रमाण जास्त आहे. मुलींना विनासायास शिक्षण घेता यावे यासाठी भगीरथ प्रयत्नांची अद्यापही गरज आहे. मुली शिकल्या, पैसे कमवू लागल्या, नोकरीच नाही तर स्वतंत्र व्यवसायही करू लागल्या पण त्यांची बाईपणाच्या ओझ्यातून सुटका झालेली क्वचितच दिसते. त्यांचेही बालपण अजून विवाहापेक्षीच आहे. हुंड्यापायी त्यांची होणारी कुचंबणा थांबलेली नाही. मालमत्तेवर त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार मिळालेला नाही. वेगवेगळ्या क्षेत्रांत कर्तबगारी गाजवणाऱ्या महिलांची संख्या कमी नाही, पण अशा स्त्रियाही बहुधा कोण्या एका पुरुषाच्या सावलीत काम करताना दिसतात. हुंडाबळी पडणाऱ्या आणि जाळून मारल्या जाणाऱ्या सुनांत, विशेषतः दिल्लीसारख्या शहरात अगदी विद्यापीठाचे शिक्षण मिळालेल्या स्त्रियांचा भरणाच अधिक.
 समाजसुधारकांच्या काळापासून स्त्रियांना संरक्षण देणारे कायदे करवून घेण्याकडे मोठा कल दिसतो. सतीबंदी, पुनर्विवाह, द्विभार्या प्रतिबंध, किमान संमतीवय, हुंडाविरोधी, सुलभ घटस्फोट, पोटगीचा हक्क, एवढेच नव्हे तर स्त्रियांवरील अत्याचाराच्या प्रकरणी विशेष न्यायालय व वेगळी न्यायपद्धती अशा अनेक विषयांवर कायदे झाले, होत आहेत, होत राहतील. सतीचा कायदा होऊन शंभराहून अधिक वर्षे झाली पण अजूनही सतीचे प्रकार होतात. पुनर्विवाह तसा दुर्मिळच. संमतीवयाचा कायदा होऊन किती वर्षे लोटली, पण ग्रामीण भागातील बहुसंख्य मुलींना अठरा वर्षांच्या आतच मुंडावळ्या बांधल्या जातात. वारसाहक्काने देऊ केलेल्या मालमत्तेवरील तुटपुंजा हक्कसुद्धा आग्रहाने मिळवू शकणाऱ्या स्त्रिया बोटावर मोजण्याइतक्या. कायद्यातील कलमे कायद्यातच राहतात. कायदा करणाऱ्यांचे नाव होते. स्त्रिया जिथल्या तिथेच राहतात.

 अनेक स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणे हाती घेतली. जेथे जेथे म्हणून स्त्रियांना मारपीट होईल तेथे जाऊन चौकशी करणे, निदर्शन करणे, पोलिसांवर दडपण आणणे, वकील देणे, कोर्टाचे कामकाज चालवणे, आरोपींवर सामाजिक बहिष्कार घालणे असे कार्यक्रम वर्षानुवर्षे पार पडत आलेले आहेत. काही प्रकरणी गुन्हेगारांना शिक्षा देवविण्यात यश मिळाले. उलट काही ठिकाणी अगदी फटफजिती झाली. एकेका प्रकरणात तड लावण्यासाठी चांगले चांगले कार्यकर्ते वर्षानुवर्षे खपले. पुष्कळसे थकले, काही बदनाम झाले. पण सोडवलेल्या एकेका प्रकरणामागे अत्याचारांची नवी शेकडो प्रकरणे उपटली. हाती तुराटे घेऊन वणवा विझवायला निघावे असा हा केविलवाणा प्रयत्न.

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ८७