पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धोक्यात येणार असेल आणि स्त्रियांच्या उठवळ वागण्याला प्रोत्साहन मिळणार असेल तर अशा तऱ्हेच्या कायद्यापेक्षा काही प्रमाणात हिंसाचार परवडला, असाही एक सूर निघाला. एवढेच नव्हे तर, नवराबायकोचे एकांतातील वर्तन यासंबंधी सरकारने डोकावू नये आणि त्यात हस्तक्षेप करू नये अशीही भूमिका महिलांनी परखडपणे मांडली.
 आणखी एका विषयावर विस्तृत चर्चा झाली. चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनात, स्त्रियांच्या शृंगारललित रूपास प्रोत्साहन देण्याच्या प्रवृत्तीचा धिक्कार करण्यात आला होता. त्यानंतरच्या २० वर्षांत ही प्रवृत्ती कमी झाली नसून वाढली आहे एवढेच नव्हे तर, मुलीही आता अहमहमिकेने अधिकाधिक शृंगारललित रूप दाखवून मॉडेल, नट्या, अभिनेत्री बनण्याचा प्रयत्न करतात असे दिसत आहे. या प्रवृत्तीला मात्र आळा कसा घालावा यासंबंधी काही निश्चित निर्णय या शिबिरांतील महिलाही देऊ शकल्या नाहीत. चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या स्त्रियांना आपोआप शिक्षा होईल, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना बहुमान देऊन त्यांची वाह वा केली जाऊ नये याबद्दल सर्वांचे एकमत झाले. महिला शिबिराने एकमताने एक ठराव संमत केला. जेथे जेथे रस्त्यावरील फलकांवर किंवा जाहिरातींवर स्त्रियांच्या शृंगारललित रूपाचे अवास्तव व उत्तान प्रदर्शन केलेले असेल त्या त्या फलकांवर किंवा जाहिरातींवर चांदवड अधिवेशनातील एका जाहिरातीतील आदिवासी स्त्रीचे- डोक्यावर पाटी घेतलेले, पाठीवर मूल बांधलेले ह्र चित्र असलेले आणि आम्ही मरावं किती?' असा मथळा असलेले पोस्टर चिकटवून आपला निषेध व्यक्त करावा.
 पसायदान
 २० वर्षांमध्ये कितीतरी प्रसंग घडले. वेगवेगळ्या वेळी स्त्रियांचे प्रश्न निर्माण झाले की मी सर्वसाधारण अडाणी, अशिक्षित स्त्रियांच्या बैठका बोलविल्या, त्याच्या पुढे माझे प्रश्न- होतील तितक्या सोप्या शब्दांत- मांडले आणि मांडल्यावर, त्यांच्याकडून प्रतिक्रियांची अपेक्षा केली. सुरुवातीला त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळविणे हेच काम कठीण होते. त्याकरिता बरीच मशागत करावी लागली. पण ती एकदा केल्यानंतर भरभरून पीक आले आणि १९८६ ते २००६ सालापर्यंत या माझ्या शेतकरी बहिणींनी मला जे, हात भरभरून, ज्ञान दिले त्याची तुलना फक्त मुक्ताईने ज्ञानेशांना केलेल्या ज्ञानसंबोधनाशीच होऊ शकते.

(शेतकरी संघटक ६ नोव्हेंबर २००६)

■ ■

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ३६